DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

पाचोऱ्यातील बॅग चोरीचा छडा; मध्य प्रदेशातून आरोपी ताब्यात

पाचोरा : पाचोरा शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेबाहेर बॅगमधून ७७ हजार ५०० रुपयांची रोकड लंपास केल्याप्रकरणी पाचोरा पोलिसांनी मध्य प्रदेशातून एका संशयित आरोपीला ताब्यात घेत चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. आरोपीकडून चोरीस गेलेली संपूर्ण रोकड हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रेस नोट क्र. 168 पाचोरा पोलीस…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फियादी दिनेश निलेश सोनवणे (वय ३०, रा. बनोटी, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) हे १९ ऑगस्ट रोजी पाचोरा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत पैसे भरण्यासाठी आले होते. बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने ते मोटारसायकलवरून काम करण्यासाठी स्वराज्य ऑटो गैराज, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गेले. यावेळी बॅगमध्ये ठेवलेली ७७ हजार ५०० रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केली. या प्रकरणी २२ ऑगस्ट रोजी पाचोरा पोलीस ठाण्यात बीएनएस कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपीचा माग

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलिसांनी तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलीस कॉन्स्टेबल हरीश परदेशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एक संशयित इसम फियादीच्या बँकेपासून स्वराज्य ऑटो गैराजपर्यंत पाठलाग करताना दिसून आला. तसेच गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीतून हा संशयित मध्य प्रदेशातील सांसी कडिया, जि. राजगड येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

‘ऑपरेशन एमपी’ राबवून आरोपी जेरबंद

माहितीच्या आधारे पाचोरा पोलिसांनी १ ऑक्टोबर रोजी ‘ऑपरेशन एमपी’ सुरू केले. तपास पथक मध्य प्रदेशात रवाना करण्यात आले. त्यानंतर राजगड जिल्ह्यातील बोड़ा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सांसी कडिया गावात स्थानिक पोलिसांच्या मदतीने ३ ऑक्टोबर रोजी अचानक छापा टाकून रितीक राजाराम सिसोदिया (रा. सांसी कडिया, जि. राजगड, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले.

आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून चोरीस गेलेली संपूर्ण ७७ हजार ५०० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली. मध्य प्रदेशातून आरोपीसह चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्याची पाचोरा पोलिसांची कारवाई उल्लेखनीय ठरली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक राहुल काशीनाथ शिंपी करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश्वर पाटील, पोलीस हवालदार काशीनाथ शिंपी, पोलीस कॉन्स्टेबल हरीश परदेशी, पोलीस शिपाई अरुण शिंपी यांच्या पथकाने केली.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.