धावपटू अतुलसिंह हाडा यांना कांस्य पदक, संजय मोती द्वितीय : राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
महाराष्ट्र राज्य मास्टर्स गेम्समध्ये जळगावच्या धावपटूंची चमकदार कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी): नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या ७ व्या महाराष्ट्र राज्य मास्टर्स गेम्स स्पर्धेत ‘जळगाव रनर्स ग्रुप’चे धावपटू अतुलसिंह हाडा आणि संजय मोती यांनी नेत्रदीपक यश संपादन करत जळगावचा नावलौकिक उंचावला आहे. या स्पर्धेत अतुलसिंह हाडा यांनी कांस्य, तर संजय मोती यांना देखील १० किलोमीटर रनिंग स्पर्धेत कास्य पदक मिळाले असून, या दोघांचीही आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो खेळाडू सहभागी झालेल्या या दोन दिवसीय स्पर्धेत जळगावच्या धावपटूंनी आपला दबदबा कायम राखला. ५०+ (पन्नास वर्षांवरील) वयोगटात झालेल्या ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत अतुलसिंह हाडा यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत तृतीय क्रमांक पटकावत कांस्य पदक जिंकले. तसेच, १० किलोमीटर धावण्याच्या खडतर स्पर्धेत संजय मोती यांनी उत्कृष्ट वेळेची नोंद करत द्वितीय क्रमांक पटकावला आणि रौप्य पदकाचे मानकरी ठरले.
नागपूर येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र
राज्यस्तरीय स्पर्धेतील या दमदार कामगिरीच्या जोरावर अतुलसिंह हाडा आणि संजय मोती हे दोन्ही खेळाडू आता राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. येत्या ८ ते १० जानेवारी २०२७ दरम्यान नागपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय मास्टर्स गेम्स स्पर्धेसाठी ते पात्र ठरले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल जळगाव रनर्स ग्रुपच्या सदस्यांसह शहरातील क्रीडा, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून, राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
