२०० दिवे बसवून शहरवासीयांच्या जखमेवर मीठ चोळू नका!
पथदिव्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक; दसरा-दिवाळीपूर्वी सर्व दिवे सुरू करण्याची मागणी
जळगाव : जळगाव शहरातील बंद पथदिव्यांचा प्रश्न गंभीर बनला असून, शहरात ८ ते १० हजार पथदिवे बंद असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने केला आहे. अशा परिस्थितीत आमदारांनी स्वखर्चातून २०० दिवे बसविण्याचे आश्वासन देण्याऐवजी शहरातील सर्व बंद पथदिवे सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. दसरा-दिवाळीपूर्वी शहरातील दिवाबत्तीचा प्रश्न मार्गी न लागल्यास आमदारांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशाराही पक्षाने दिला आहे.
जळगाव शहरातील पथदिव्यांचा प्रश्न गेल्या वर्षभरापासून कायम असल्याचा आरोप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. शहरातील सुमारे तीन टक्के भाग अंधारात असल्याचे सांगताना, हजारो पथदिवे बंद असल्यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. गणेशोत्सवापूर्वी तसेच त्यानंतरही पथदिव्यांच्या समस्येबाबत तक्रारी करूनही त्यांची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शहरातील जुन्या व चांगल्या प्रकाशमान असलेल्या मर्क्युरी दिव्यांच्या जागी कमी प्रकाश देणारे एलईडी दिवे बसविण्यात आल्याचा दावा पक्षाने केला आहे. ईएसआय कंपनीला काम दिल्यानंतर सुमारे २० ते २१ हजार एलईडी दिवे बसविण्याची प्रक्रिया राबविण्यात आली; मात्र काम अपूर्ण सोडून कंपनी निघून गेल्याने शहरातील प्रकाशव्यवस्थेचा प्रश्न अधिकच गंभीर झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या कामातील त्रुटींबाबत सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी पुरेशा प्रमाणात पाठपुरावा केला नसल्याची टीकाही पक्षाने केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पथदिव्यांच्या प्रश्नावर वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या; मात्र त्यावर ठोस कार्यवाही झालेली नाही, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महापालिकेने स्थानिक पातळीवर पथदिवे दुरुस्तीचा ठेका देण्याबाबत ठराव मंजूर केला असतानाही शासनाच्या स्तरावरून राज्यातील महापालिका व नगरपालिकांसाठी एजन्सी नियुक्तीच्या जाचक अटी घालण्यात आल्याने स्थानिक प्रशासनाच्या अधिकारांवर मर्यादा आल्याचा आरोपही पक्षाने केला आहे.
शहरातील हजारो दिवे बंद असताना केवळ २०० दिवे बसविण्याचे आश्वासन देणे म्हणजे उर्वरित नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यासारखे असल्याची भूमिका पक्षाने मांडली. शहरातील काही भागांत दिवे सुरू करून इतर भाग अंधारात ठेवण्याऐवजी संपूर्ण शहरातील पथदिव्यांची दुरुस्ती व आवश्यक ठिकाणी नवीन दिवे बसविण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
महापालिकेत सत्ताधारी लोकप्रतिनिधींचे वर्चस्व असताना पथदिव्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्रपणे २०० दिवे बसविण्याची घोषणा करण्याची वेळ का आली, असा सवालही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. स्थानिक पातळीवरील मतभेद बाजूला ठेवून नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य द्यावे. हायमास्ट दिवे असोत किंवा सामान्य पथदिवे, आवश्यकतेनुसार सर्व बंद दिवे दसरा-दिवाळीपूर्वी सुरू करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, कार्याध्यक्ष राजुभाऊ मोरे, डॉ. संग्रामसिंह सूर्यवंशी, जिल्हा कार्यालय सरचिटणीस सुनील माळी, जिल्हा उपाध्यक्ष किरणभाऊ राजपूत, गणेश पाटील, भगवान सोनवणे, अमोल कोल्हे, सुमनताई बनसोडे, माधुरीताई पाटील, युवक महानगर जिल्हाध्यक्ष विनायक पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कल्पिताताई पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष मंगलाताई पाटील, ललित नारखेडे, विधानसभा शहरप्रमुख जयप्रकाश महाडिक, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मजहरभाई पठाण, विद्यार्थी युवक जिल्हाध्यक्ष गौरव वाणी, सरचिटणीस सुहास चौधरी, अल्पसंख्याक महानगर अध्यक्ष रईस खाटीक, नईम खाटीक, गणेश हटकर, रफीक पटेल, विशाल देशमुख यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दिवाबत्तीचा प्रश्न न सुटल्यास आंदोलन
दसरा-दिवाळीसारखे सण जवळ आले असताना शहरातील रस्ते अंधारात राहणे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चिंताजनक असल्याचे पक्षाने म्हटले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन बंद पथदिवे सुरू करावेत आणि संपूर्ण शहरासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निर्धारित कालावधीत प्रश्न न सुटल्यास आमदारांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
