गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न
जळगाव, ९ ऑक्टोबर: जळगाव येथील गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे आयोजित महात्मा गांधी यांच्या सामाजिक दृष्टिकोनाच्या समकालीन प्रासंगिकतेवर आधारित तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न झाली. ‘गांधी २१ व्या शतकात’ या मालिकेचा एक भाग म्हणून ७ ते ९ ऑक्टोबर दरम्यान ‘स्वराज्यासाठी रचनात्मक कार्यक्रम: स्वशासनाच्या कलेचा पुनरुज्जीवन’ या मुख्य संकल्पनेवर ही परिषद आधारित होती.

या परिषदेत देशभरातील २५ अभ्यासक आणि तळागाळातील कार्यकर्ते, तसेच पदव्युत्तर पदविका कार्यक्रमातील २० तरुण विद्यार्थी सहभागी झाले होते. या तीन दिवसांत समुदाय निर्मिती, परस्पर विश्वास आणि सामूहिक कृतीच्या माध्यमातून आधुनिक सामाजिक आव्हानांना तोंड देण्यासाठी गांधीजींचे सत्य, अहिंसा आणि स्वशासनाचे विचार कसे लागू करता येतील, यावर सखोल चर्चा झाली.
परिषदेत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मार्गदर्शन केले. डॉ. एम. पी. मथाई यांनी आंतरराष्ट्रीय शांतता आणि सौहार्दावर प्रकाश टाकताना जागतिक शांतता निर्मितीच्या संदर्भांचा उल्लेख केला. सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील डॉ. अनिल नौरिया यांनी समकालीन समाजात जातीय सलोखा आणि परस्पर समन्वयाची तीव्र गरज अधोरेखित केली. तर श्रीमती तृप्ती पारिख यांनी महिला सक्षमीकरणावर संदेश देताना न्याय आणि समानतेसाठी सत्य व अहिंसा हीच प्रभावी साधने असल्याचे प्रतिपादन केले.
परिषदेचे अध्यक्षस्थान संस्थेचे अभ्यागत प्राध्यापक श्री बरुण मित्रा यांनी भूषवले. संस्थेच्या संचालक मंडळाचे सदस्य व मार्गदर्शक डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी चर्चासत्रांचे संचालन केले, तर संशोधन अधिष्ठाता डॉ. गीता धरमपाल यांनी स्वागतपर भाषण व आभार प्रदर्शन केले. परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. अश्विन झाला सहकार्य केले तर मोनालिसा सोमवंशी यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.
अनुभवी अभ्यासक आणि तरुण कार्यकर्त्यांना एकाच व्यासपीठावर आणून, शांततापूर्ण व शाश्वत समाज निर्मितीसाठी गांधीवादी विचारांचा व्यावहारिक वापर करण्याची प्रेरणा या परिषदेने दिली, असे आयोजकांनी सांगितले.