जळगावात घरफोडी करणारा सराईत चोरटा जेरबंद
शहर पोलिसांची कारवाई; अवघ्या सहा तासांत गुन्ह्याची उकल, २८ हजारांची रोकड हस्तगत
जळगाव : शहरातील निसार कॉलनी परिसरात घरफोडी करून चांदीचे पैंजण, सोन्याच्या पोती आणि रोकड असा मुद्देमाल चोरणाऱ्या सराईत चोरट्याला जळगाव शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. असमतखा इलियास खा कुरेशी (रा. गेंदालाल मिल, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून २८ हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली असून, पोलिसांनी अवघ्या सहा तासांत या गुन्ह्याची उकल केली आहे.
शहरातील घरफोडी व चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या नेतृत्वाखाली जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला.

दि. ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ ते ४ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेदरम्यान निसार कॉलनी, गट क्रमांक ३४७/२, प्लॉट क्रमांक २७/२ येथील रहिवासी शेख अनिस शेख चाँद यांच्या घरात चोरी झाली होती. अज्ञात चोरट्याने घरातून सुमारे १७ हजार रुपये किमतीचे चांदीचे पैंजण, आठ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन पोती आणि चार हजार रुपये रोख असा एकूण २९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी गेंदालाल मिल परिसरात संशयिताचा शोध घेतला. याचदरम्यान गुप्त बातमीदाराकडून असमतखा इलियास खा कुरेशी याने घरफोडी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरात शोध घेतला असता संशयित आढळून आला.
पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, विश्वासात घेऊन अधिक चौकशी केल्यानंतर त्याने घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याला संबंधित गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्याच्याकडून २८ हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शोध पथकातील जीपीएसआय सुनील पाटील, सहायक फौजदार दीपक शिरसाट, पोलीस हेडकॉन्स्टेबल नंदलाल पाटील, भगवान पाटील, उमेश भांडारकर, सतीश पाटील, वीरेंद्र शिंदे, योगेश पाटील तसेच पोलीस कर्मचारी अमोल ठाकूर, राहुलकुमार पांचाळ, प्रणय पवार आणि भगवान मोरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
शहरातील घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना तातडीने पकडण्याच्या दृष्टीने जळगाव शहर पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणात हस्तगत केलेल्या मुद्देमालासह पुढील तपास केला जात आहे.