DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांची ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम

अवैध धंद्यांविरुद्ध धडक कारवाई; गावठी दारूसह जुगार, अमली पदार्थ आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

जळगाव : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी ‘ऑपरेशन ऑल आऊट’ ही विशेष मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान अवैध धंदे, जुगार, दारूविक्री, अमली पदार्थ, शस्त्र बाळगणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी एकाच वेळी तपासणी आणि कारवाई केली.

जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे आणि सण-उत्सवाच्या काळात शांततेचे वातावरण कायम ठेवणे, हा या मोहिमेचा उद्देश होता. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे आणि संबंधित शाखांच्या पथकांनी विविध ठिकाणी नाकाबंदी, वाहनांची तपासणी, संशयितांची चौकशी तसेच अवैध धंद्यांच्या ठिकाणी छापे टाकले.

अवैध दारू आणि जुगाराविरुद्ध कारवाई

या मोहिमेत अवैध गावठी हातभट्टी दारूविरुद्ध कारवाई करत ११८ गुन्हे दाखल करण्यात आले असून, १२८ आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत ५ हजार ३७० लिटर गावठी हातभट्टी दारू, रसायने, वॉश आणि साहित्य जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ५ लाख ७ हजार १४० रुपये असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.

देशी व विदेशी दारूच्या अवैध विक्रीविरुद्धही पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणांत ४७ गुन्हे दाखल करून ५१ आरोपींना अटक करण्यात आली. तसेच जुगार कायद्यान्वये ७२ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ८५ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत ५२ हजार २५५ रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

शस्त्र अधिनियमान्वये करण्यात आलेल्या कारवाईत गावठी कट्टा आणि तलवार जप्त करण्यात आली. अवैध वाळूविक्रीविरुद्धही एक गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक करण्यात आली. या कारवाईत सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम राबविली. वाहतूक शाखेकडून मोटार वाहन कायद्यान्वये १ हजार २१८ केसेस दाखल करण्यात आल्या. त्यातून १० लाख ४४ हजार ४७० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलीस स्टेशन स्तरावर करण्यात आलेल्या कारवाईत ७७८ केसेस दाखल करून ५ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

याशिवाय मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध ३६ केसेस दाखल करण्यात आल्या. सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून शांतता भंग करणाऱ्यांविरुद्ध ३५, तर मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध स्वतंत्रपणे ३६ केसेसची नोंद करण्यात आली. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून रस्ते सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले.

महिलांच्या सुरक्षिततेसह अवैध धंद्यांवर लक्ष

मोहिमेदरम्यान हरविलेल्या महिला, पुरुष, मुली आणि मुलांचा शोध घेण्यावरही भर देण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, ६२ महिलांसह १४६ पुरुष, ३० मुली आणि १२ मुलांचा शोध घेण्यात आला.

भंगार दुकानांची तपासणी करताना १०१ दुकाने तपासण्यात आली. त्यापैकी १४ दुकानांविरुद्ध मुंबई पोलीस अधिनियमातील संबंधित तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली. पानटपऱ्यांविरुद्धच्या मोहिमेत कोटपा कायद्यान्वये १०८ केसेस दाखल करण्यात आल्या. तसेच १०० मीटर परिसरातील ११ पानटपऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

इलेक्ट्रिक मोटार आणि वायर चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणण्यात आले. या कारवाईत दोन मोटार पंप आणि एक मोटारसायकल असा एकूण २४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अवैध वाळूविक्रीविरुद्धच्या कारवाईत एक गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक करण्यात आली.

फरार आरोपींचा शोध आणि प्रतिबंधात्मक कारवाई

मोहिमेदरम्यान पाहिजे असलेल्या आरोपींना पकडण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. एकूण १० आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. हद्दपार आरोपींविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये सहा कारवाया करण्यात आल्या. तसेच मध्यप्राशन करून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांविरुद्ध ३५ केसेस दाखल करण्यात आल्या.

याशिवाय संवेदनशील ठिकाणी तपासणी, संशयित व्यक्तींची चौकशी, हॉटेल आणि ढाब्यांची तपासणी तसेच इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. मोहिमेदरम्यान ६७ हॉटेल व ढाब्यांची तपासणी करण्यात आली. समन्स व वॉरंट बजावणीसह सायबर रिटर्न्स संदर्भातील कारवाई आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून ईओडब्ल्यू अमाउंट ब्लॉक करण्याची कारवाईही करण्यात आली.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

नवरात्रोत्सव शांततेत, सुरक्षित आणि निर्भय वातावरणात साजरा करावा. कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे, अफवा पसरवू नयेत आणि कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन जळगाव जिल्हा पोलिसांनी केले आहे. महिलांचा सन्मान राखावा, उत्सवाच्या काळात नियमांचे पालन करावे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

ही मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव), तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी राबविली. जिल्ह्यात शांतता, सुरक्षितता आणि कायद्याचे पालन सुनिश्चित करण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.