DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

कोर्ट चौक ते असोदा रस्त्याचे काँक्रिटीकरण रखडले; राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल

आमदार-मक्तेदारांच्या वादामुळे काम बंद असल्याचा आरोप; काम पूर्ण न झाल्यास मनपासमोर आंदोलनाचा इशारा

जळगाव : शहरातील कोर्ट चौक ते असोदा रस्त्याचे काँक्रिटीकरण गेल्या सहा महिन्यांपासून रखडल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने केला आहे. पाणीटंचाईचे कारण पुढे करून हा महत्त्वाचा रस्ता रखडविण्याचे धोरण चुकीचे असून, तातडीने काम पूर्ण करावे, अशी मागणी पक्षाने केली आहे. अन्यथा महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महानगर जिल्हाध्यक्ष अशोक एस. लाडवंजारी यांनी दिला आहे.
शहरातील काव्यरत्नावली चौक, आकाशवाणी चौक, स्वातंत्र्य चौक, स्टेडियम चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेहरू चौक, टॉवर चौक, महात्मा गांधी मार्केट चौक, भीलपुरा चौक आणि वाल्मिकनगरमार्गे असोदा रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. यातील काव्यरत्नावली चौक ते कोर्ट चौक तसेच चित्रा चौक, पुष्पलता बेंडाळे चौक, वैकुंठधाम आणि अजिंठा चौफुलीपर्यंतचे काम पूर्ण झाल्याचे पक्षाने म्हटले आहे. मात्र, कोर्ट चौक ते असोदा रस्त्यावरील वाल्मिकनगर परिसरातील काम बंद असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पाणीटंचाईचे कारण कितपत योग्य?
आमदार आणि मक्तेदार यांच्यातील वादामुळे गेल्या सहा महिन्यांपासून काम बंद असल्याचा आरोप पक्षाने केला आहे. दुसरीकडे, रिंगरोडचे काँक्रिटीकरण तसेच शहरातील इतर रस्त्यांची कामे सुरू असल्याचे सांगत, कोर्ट चौक ते असोदा रस्त्याच्या कामासाठीच पाणीटंचाईचे कारण का पुढे केले जात आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. बुकब्रॉड कॉलनी ते खाजामिया चौकापर्यंत रिंगरोडचे काँक्रिटीकरण झाले असून, दुसऱ्या बाजूचे कामही पूर्ण करण्याचे आश्वासन लोकप्रतिनिधींनी दिल्याचा दावा पक्षाने केला आहे. तसेच शिरसोली रस्ता ते मोहाडी रस्त्याचे काम डिसेंबरपर्यंत सुरू करून पूर्ण करण्याबाबतच्या बातम्यांचाही संदर्भ देण्यात आला आहे.

मुख्य रस्ता असल्याने नागरिकांची गैरसोय
कोर्ट चौक ते असोदा हा शहरातील महत्त्वाचा रस्ता असून, शहरातील नागरिक, विद्यार्थी आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातील रहिवासी मोठ्या प्रमाणावर या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या रस्त्याचे काम रखडल्याने वाहतुकीसह नागरिकांच्या दैनंदिन प्रवासावर परिणाम होत असल्याचे पक्षाने म्हटले आहे. दरम्यान, ९ ऑक्टोबर रोजी झालेल्या महानगरपालिकेच्या महासभेत सुमारे २० ते २२ कोटी रुपयांच्या गटार, कन्व्हर्टर आणि संरक्षक भिंतींसह विविध कामांना मंजुरी देण्यात आल्याचा उल्लेखही पक्षाने केला आहे. इतर कामांना मंजुरी मिळत असताना या रस्त्याचे काँक्रिटीकरण मात्र रखडणे योग्य नसल्याचे पक्षाचे म्हणणे आहे.

काम पूर्ण करण्याची मागणी
कोर्ट चौक ते असोदा रस्त्याचे काँक्रिटीकरण तातडीने सुरू करून पूर्ण करावे, अन्यथा महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
या मागणीच्या भूमिकेत महानगर कार्याध्यक्ष राजुभाऊ मोरे, डॉ. संग्रामसिंह सूर्यवंशी, जिल्हा कार्यालय सरचिटणीस सुनील माळी, जिल्हा उपाध्यक्ष किरणभाऊ राजपूत, गणेशभाऊ पाटील, सुमनताई बनसोडे, अमोल कोल्हे, माधुरीताई पाटील, युवक महानगर जिल्हाध्यक्ष विनायक पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मंगलाताई पाटील, सरचिटणीस सुहास चौधरी, ललित नारखेडे, विधानसभा प्रमुख जयप्रकाश महाडिक, विद्यार्थी आघाडी महानगराध्यक्ष गिरीश सांगळे, अकबरभाई पठाण, अल्पसंख्याक महानगर जिल्हाध्यक्ष रईसभाई खाटीक, विशाल देशमुख, गणेश हटकर, गणेश सोनार आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.