DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

सचिन तेंडुलकरच्या ‘बॉडीगार्ड’ची जामनेरात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

जामनेर : प्रतिनिधी
शहरातील जळगाव रस्त्यावरील गणपती नगरमध्ये वास्तव्यास असलेले प्रकाश गोविंदा कापडे (वय ३७) यांनी राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. त्यांचा मृतदेह जळगाव येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
सीआरपीएफमध्ये प्रकाश कापडे हे कार्यरत होते. त्यांची पोस्टिंग मुंबई येथे सचिन तेंडुलकर यांच्याकडे बॉडीगार्ड म्हणून झालेली होती. यापूर्वी त्यांनी छगन भुजबळ, नारायण राणे यांच्याकडे अंगरक्षकाची जबाबदारी पार पाडली होती. प्रकाश कापडे हे लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी जामनेर येथे काही दिवसांची सुट्टी घेऊन आले असल्याची माहिती मिळाली. ते आपल्या कुटुंबासह शेगाव येथे दर्शनास जाऊन आल्याचीही माहिती मिळाली आहे. रात्रीचे जेवण आटोपून घरातील मंडळी झोपी गेल्यानंतर रात्री १ वाजेच्या सुमारास प्रकाश कापडे यांनी राहत्या घरीच डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे दिसून आले.
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जामनेर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला होता. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.