पुण्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश, दोन तरुणींची सुटका, दलाल अटक
पुणे : शहरात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीबरोबरच अवैध धंद्यांचं प्रमाणही वाढताना दिसत आहे. अशातच वेश्याव्यवसायाच्या आणखी एका प्रकरणाचा पर्दाफाश झाला असून, पश्चिम बंगालमधील दोन तरुणींना या व्यवसायात ढकलणाऱ्या एका दलालाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या तरुणींची सुटका केली असून, अटकेत घेतलेल्या आरोपीची पत्नी मात्र फरार आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राजू चिद्रवार-पाटील (वय 25, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) असे असून, त्याची पत्नी मीरा चिद्रवार हिच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजू आणि त्याची पत्नी मीरा यांनी पश्चिम बंगालमधील दोन तरुणींना “पुण्यातील ब्यूटी पार्लरमध्ये चांगली नोकरी मिळेल” असे आमिष दाखवले. त्या तरुणी नोकरीच्या आशेने पुण्यात आल्यावर, त्यांना कामावर न घेता जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आले.
गेल्या आठवड्यात आरोपीने आणखी एका तरुणीला पुण्यात आणून तिच्यावरही दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र संधी मिळताच त्या तरुणीने पुणे पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत तक्रार नोंदवली.
तक्रार मिळताच भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी दोन तरुणींची सुटका करून घेतली आणि राजू चिद्रवारला अटक केली. त्याची पत्नी मीरा मात्र फरार असून, पोलिस तिचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.