कुंभमेळ्याच्या नामकरणावरून साधू-महंतांमध्ये मतभेद
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नामकरणावरून पुन्हा एकदा मतभेद निर्माण झाले आहेत. त्र्यंबकेश्वर येथील साधू-महंतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कुंभमेळ्याचा उल्लेख ‘त्र्यंबकेश्वर-नाशिक कुंभमेळा’ असा करण्याची मागणी केली. मात्र, नाशिकच्या साधू-महंतांनी या मागणीला तीव्र आक्षेप घेतला आहे.
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर येथे भेट दिली. यावेळी साधू-महंतांनी ‘त्र्यंबकेश्वर हेच सिंहस्थाचे मुख्य स्थान असल्याने कुंभमेळ्याच्या नावात त्र्यंबकेश्वरचा प्रथम उल्लेख व्हावा,’ अशी मागणी केली. त्यावर नाशिकच्या साधू-महंतांनी ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा’ असे नामकरण योग्य असल्याचा दावा केला.
जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नाशिकच्या साधू-महंतांनी इतिहास आणि व्याकरणाच्या दृष्टीने ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा’ हेच नाव योग्य असल्याचे सांगितले. पूर्वीपासून याच नावाचा उल्लेख असल्याचा दाखला देत ‘अनावश्यक वाद टाळावा,’ असेही आवाहन करण्यात आले. सरकारी पातळीवर या वादावर निर्णय घेतला जाईल, असे सांगत प्रशासनाने मात्र कोणताही ठोस भूमिका घेतलेली नाही.
नामकरणाचा निर्णय मुख्यमंत्री घेणार
वादाबाबत माध्यम प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना विचारणा केली असता नामकरणाबाबतचा वादाबाबत स्थानिक पातळीवर निर्णय होणे शक्य नाही. त्र्यंबकेश्वर आणि नाशिकच्या साधु- महंताचे म्हणणे ऐकून जुन्या प्रशासकीय नोंदी आणि जुन्या संदर्भांचा अभ्यास करून या वादाबाबत मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरच निर्णय घेण्यात येईल, असे शर्मा यांनी स्पष्ट केले.