दशक्रिया विधीनंतर भीषण अपघातात माय-बाप आणि चिमुकल्याचा मृत्यू; लातूर हादरलं
लातूर – लातूर-जहीराबाद महामार्गावरील हलगरा पाटीलजवळील शनी मंदिरासमोर आज सायंकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला. दशक्रिया विधीवरून परतणाऱ्या कांबळे कुटुंबाच्या दुचाकीला भरधाव क्रूझरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आई, वडील आणि त्यांचा मुलगा तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
भरधाव क्रूझरची दुचाकीला धडक – तिघांचा जागीच मृत्यू
प्राथमिक माहितीनुसार, कर्नाटकातील बुद्धी येथून परतणाऱ्या कांबळे कुटुंबाच्या दुचाकीला मागून आलेल्या क्रूझरने धडक दिली. यात निलंगा तालुक्यातील काशिनाथ शंकर कांबळे, त्यांची पत्नी जिजाबाई आणि मुलगा क्रांती कुमार या तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून अपघातस्थळी पाहणाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती.
रस्त्याच्या निकृष्ट कामावर पुन्हा प्रश्नचिन्ह
लातूर-जहीराबाद महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम आणि रस्त्यावर पडलेल्या भेगांमुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या रस्त्यावर आतापर्यंत २०० हून अधिक लोकांनी प्राण गमावले आहेत. सामाजिक कार्यकर्ते तुळशीदास साळुंखे यांनी प्रशासनावर दुर्लक्ष केल्याचा आरोप करत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.