राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; कोकण-घाटमाथ्याला अलर्ट, विदर्भात शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
दिव्यसारथी न्यूज नेटवर्क | राज्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाची सक्रियता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या ३ ते ४ दिवसांमध्ये कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा धोका, अलर्ट जारी
हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट तर पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विशेषतः रत्नागिरी व पुण्याच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या भागांमध्ये दरड कोसळण्याचा तसेच नद्यांची पाणीपातळी वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
विदर्भात पावसाचे दुर्भिक्ष; शेतकरी चिंतेत
दुसरीकडे, विदर्भात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी अजूनही पेरण्या करण्यासाठी प्रतीक्षेत आहेत.
अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आकाश ढगाळ असले तरी पावसाचा जोर अजूनही कमी आहे. ही भागांत पाणीटंचाईचे संकट गडद होत आहे. अकोल्यातील धरणांमध्ये पाणीसाठा कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याचीही चिंता वाढली आहे.
सावधगिरी बाळगण्याचे आवाहन
हवामान विभागाने घाटमाथा आणि कोकणातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
सध्या दरड कोसळणे, पूरसदृश परिस्थिती, विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांचा इशाराही देण्यात आला आहे.