“भाजपमध्ये आता जाण्याची इच्छा नाही” – एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर पुन्हा घणाघात
जळगाव | दिव्यसारथी न्यूज नेटवर्क
राजकारणात ‘घरवापसी’च्या चर्चेत असलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आता मला भाजपमध्ये जायची इच्छा नाही.” यासोबतच त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर नाव न घेता परंतु थेट शब्दांत सदोष पक्षप्रवेशावरून टीका केली आहे.
खडसेंचा भाजपवरील रोष कायम
खडसे म्हणाले, “माझी भाजपमध्ये परतण्याची इच्छा होती, मी दिल्लीला जाऊन पक्षश्रेष्ठींनाही भेटलो होतो. पण राज्यातील काही नेत्यांच्या विरोधामुळे ते शक्य झालं नाही. आता मात्र मला भाजपमध्ये जाण्याची अजिबात इच्छा नाही.”
“दाऊदच्या साथीदारांसोबत नाचणाऱ्यांना पक्षात घेतात!”
थेट शब्दांत खडसे म्हणाले, “जे लोक दाऊद इब्राहिमच्या साथीदार सलीम कुत्तासोबत नाचले, त्यांनाही भाजपमध्ये घेतलं जातं. अशा लोकांसोबत मला राहायचं नाही. त्यामुळे माझं भाजपमध्ये जाणं शक्य नाही.” हे वक्तव्य करताना त्यांनी नाव न घेता गिरीश महाजनांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावर जोरदार टोला लगावला.
“मी संघ स्वयंसेवक, पण भाजपची सक्ती संघाने कधीच केली नाही”
खडसे म्हणाले, “मी महाविकास आघाडीत असलो तरी मी ४० वर्ष भाजपमध्ये काम केलं आहे. आणीबाणीचा काळ अनुभवलेला आहे. मी संघ स्वयंसेवक आहे, पण संघाने कधी भाजपमध्ये राहा असं सांगितलेलं नाही. संघाने शिकवलंय की, हिंदुत्वाचा मुद्दा महत्त्वाचा आहे, पक्ष कुठलाही असो.”
राजकीय संकेत?
एकनाथ खडसेंच्या या भाषणातून त्यांच्या मनातील भाजपबद्दलचा रोष, तसेच सध्याच्या नेतृत्वाबाबत नाराजी पुन्हा एकदा उघड झाली आहे. भाजपमध्ये काहीजण “हिंदुत्व म्हणजेच भाजप” म्हणतात, त्या विधानालाही खडसे यांनी अप्रत्यक्षरित्या आव्हान दिलं आहे.