DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

मनपाचे दुर्लक्ष; स्वागताच्या तयारीत सुरक्षेला तिलांजली

आकाशवाणी चौकातील बांबूचे स्ट्रक्चर ठरतंय धोकादायक

जळगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रविवारी (दि.17) होणाऱ्या जिल्हा दौर्‍यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. शहरभर स्वागतासाठी बॅनर, झेंडे लावले जात असून काही ठिकाणी रस्त्यांच्या मध्यभागीच बांबूंच्या चौकटी उभारल्या गेल्या आहेत. मात्र अशा असुरक्षित स्ट्रक्चर्समुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः आकाशवाणी चौकातील बांबूचे स्ट्रक्चर गंभीर धोक्याचे कारण ठरत आहे.

धोकादायक स्ट्रक्चरमुळे अपघाताची भीती
आकाशवाणी चौक हा शहरातील प्रमुख वाहतूकमार्ग. या ठिकाणी बांबूंचे चौकोनी स्ट्रक्चर उभारून त्यावर मोठ्या आकाराचे बॅनर लावले गेले आहेत. वादळी वा-यामुळे किंवा पावसामुळे हे स्ट्रक्चर कोसळले, तर मोठी जीवितहानी होऊ शकते. या फलकांना परवानगी कोणी दिली, याबाबत नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मनपाचा हलगर्जीपणा उघड
महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडे विचारणा केली असता कर्मचारी वसंत पाटील यांनी यासंदर्भात नोटीस देण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र शनिवार-रविवार सुट्टी असल्यामुळे कारवाई सोमवारपर्यंत लांबणार असल्याची माहिती मिळाली. उपआयुक्त धनश्री शिंदे यांनी मात्र यावर काहीही भाष्य केले नाही. त्यामुळे मनपाची भूमिका दुर्लक्षाचीच असल्याची टीका नागरिक करत आहेत.

उत्साहाच्या नादात नियमबाह्य बॅनरबाजी
अजित पवार यांच्या स्वागतासाठी जीएस ग्राऊंडवर वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे. परंतु कार्यकर्त्यांचा उत्साह अनधिकृत बॅनरबाजी आणि धोकादायक स्ट्रक्चरच्या रूपाने नागरिकांच्या जिवाशी खेळ करत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.