वाहनधारकांना मोठा दिलासा : HSRP बसवण्याची डेडलाईन नोव्हेंबर अखेरपर्यंत
मुंबई : राज्यातील वाहनधारकांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांमध्ये हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत आणखी एकदा वाढवण्यात आली असून, आता ती नोव्हेंबर अखेरपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. याआधी ही मर्यादा अनेकदा वाढवण्यात आली होती.
वाहनधारकांसाठी महत्त्वाचा निर्णय
या वर्षी सुरुवातीला ही मुदत मार्च अखेरपर्यंत होती. नंतर ती एप्रिल, जून आणि १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली. मात्र वाहनधारकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन ही मुदत आता चौथ्यांदा नोव्हेंबर अखेरपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्य परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी याबाबत परिपत्रक जारी केलं आहे.
RTO ला स्पष्ट आदेश
परिवहन विभागाने सर्व RTO कार्यालयांना आदेश दिले आहेत की,
-
HSRP न बसवलेल्या वाहनांवर मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, गहाणखत जोडणे/काढणे थांबवावे.
-
फ्लाइंग स्क्वॉडकडून जप्त झालेली वाहने HSRP बसवल्याशिवाय सोडू नयेत.
-
HSRP शिवाय वाहनांची पुन्हा नोंदणी, बदल किंवा परवाना नूतनीकरण करता कामा नये.
निर्धारित तारखेनंतर HSRP नसलेल्या वाहनांवर थेट कारवाई केली जाईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.
मोठ्या संख्येने अपॉइंटमेंट्स
वाहतूक विभागानुसार, आतापर्यंत सुमारे ६८ लाख वाहनधारकांनी अपॉइंटमेंट बुक केली असून, त्यापैकी ४७ लाख वाहनांवर HSRP बसवण्यात आली आहे. राज्यातील २.१० कोटींहून अधिक जुन्या वाहनांवर HSRP बसवणं अनिवार्य आहे. यासाठी तीन कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली असून, डिसेंबर २०२४ पासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे.