DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीचा दिवाळीनंतर धमाका

जळगाव : प्रतिनिधी 

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या  संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी निवडणुकीचा बिगुल आज फुंकला. दिवाळीनंतर  निवडणुकीचा धमाका उडणार असून, सोमवार (ता. ११)पासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याला सुरवात होत आहे. २१ नोव्हेंबरला प्रत्यक्ष मतदान होईल.

 

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यात ११ ऑक्टोबरपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याला सुरवात होणार आहे. १८ पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. २० ऑक्टोबरला छाननी होईल. २१ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरपर्यंत माघारीची मुदत राहणार आहे. त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार असून, २१ नोव्हेंबरला मतदान व लगेच २२ तारखेस मतमोजणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

जिल्हा बँकेत निवडणूक कार्यालय

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी बँकेतील सभागृहात कार्यालय कार्यान्वित करण्यात आले असून, वाहने आणि विश्रामगृहदेखील सहकार विभागाकडून अधिग्रहीत करण्यात आले आहेत. बँकेच्या सभागृहातील कार्यालयात निवडणुकीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आधीच जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

सर्वपक्षीय पॅनल वांध्यात

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी यंदाही सर्वपक्षीय पॅनलचा फंडा वापरण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चिमणराव पाटील यांनी पुढाकार घेत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या आठ जणांची कोअर कमिटी बनविली आहे. तिची एकच बैठक झाली. या बैठकीनंतर भाजपचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यात वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. त्यामुळे या सर्वपक्षीय पॅनलबाबत अद्याप अनिश्‍चितता आहे. शिवाय, जनहित मंचनेही या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला असल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची आशा मावळली आहे.

 

भाजप देणार स्वतंत्र पॅनल?

जिल्हा बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वपक्षीयसह स्वतंत्र पॅनलचीही चाचपणी सुरू आहे. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी काही पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन याबाबतची रणनीती आखण्याला सुरवात केली आहे. त्यामुळे बँक निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, असा सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहे.

 

गेल्यावेळीही होते सर्वपक्षीय पॅनल

गेल्यावेळी तत्कालीन पालकमंत्री असताना एकनाथ खडसेंनी सर्वपक्षीय पॅनलसाठी पुढाकार घेऊन निवडणूक लढली. त्यात सर्व पक्षांना न्याय देण्यात येऊन अध्यक्षपद भाजपकडे रोहिणी खडसेंच्या रुपात, तर आमदार किशोर पाटील यांच्याकडे उपाध्यक्षपद होते. आता या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल होते का, झाले तर त्यात कोणाची वर्णी लागते, याबाबत उत्सुकता लागून आहे.

 

…असा आहे कार्यक्रम

११ ते १८ ऑक्टोबर : अर्ज दाखल करणे

२० ऑक्टोबर : अर्जांची छाननी

८ नोव्हेंबरपर्यंत : अर्ज माघारीची मुदत

२१ नोव्हेंबर : मतदान

२२ नोव्हेंबर : मतमोजणी

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.