हिमाचलमध्ये मान्सूनचा कहर : ३६६ जणांचा बळी, हजारो घरे उद्ध्वस्त
सिमला : हिमाचल प्रदेशात यंदाच्या मान्सून हंगामाने भीषण रूप घेतले असून २० जूनपासून ६ सप्टेंबरपर्यंत तब्बल ३६६ लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या महसूल विभागाच्या अहवालानुसार, मुसळधार पाऊस, ढगफुटी, भूस्खलन आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी व मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
पावसाशी संबंधित घटनांमध्ये २०३ जणांचा मृत्यू, तर रस्ते अपघातात १६३ जणांचा बळी गेला. भूस्खलन (४२), बुडून (३४), ढगफुटी (१७), अचानक पूर (९), विजेचा धक्का (१५), झाडावरून पडणे (४०) आणि सर्पदंश (१५) या कारणांमुळे मृत्यूंची नोंद झाली आहे.
मंडी (३७), कांग्रा (३१), कुल्लू (२५) आणि चंबा (२१) या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बळी गेले. रस्ते अपघातांतही मंडी व चंबा (२२-२२ मृत्यू) आघाडीवर आहेत.
मान्सूनमुळे सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे तब्बल ४ लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. ३,३९० घरे अंशतः उद्ध्वस्त, तर ७७५ घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. पशुधनात १,४६४ जनावरे आणि जवळपास २७ हजार कुक्कुटपालनातील पक्षी दगावले.
राज्यात या काळात १३५ भूस्खलन, ९५ पुराचे तडाखे आणि ४५ ढगफुटीच्या घटना नोंदल्या गेल्या असून, लाहौल-स्पिती, मंडी आणि कुल्लू जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे.