प्रवाशाकडून लुटलेले ४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त; चौघांना अटक
जळगाव एलसीबीची मोठी कारवाई
प्रवाशांकडून लुटलेले ४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त; चौघांना अटक
जळगाव एलसीबीची मोठी कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रेल्वे प्रवाशाला मारहाण करून लुटलेले ४ लाख ५० हजार रुपये रोख हस्तगत करत मध्यप्रदेश व जळगाव जिल्ह्यातील सराईत दरोडेखोरांच्या टोळीतील चौघांना जेरबंद केले आहे. तर या प्रकरणातील एक आरोपी फरार असून त्याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
दिनांक १८ सप्टेंबर रोजी एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना जी.एस. ग्राउंड परिसरात संशयित हालचाली होत असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोउपनि सोपान गोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संशयित इसमांना घेराव घालून पकडले. त्यांच्या ताब्यात असलेल्या विना नंबरच्या हिरो स्प्लेंडर मोटारसायकलला लावलेल्या पिशवीत मोठी रोख रक्कम आढळली.
सखोल चौकशीत हरिष रायपुरे (रा. बऱ्हाणपूर, म.प्र.) याने कबुली दिली की, दि. ९ सप्टेंबर रोजी किरण हिवरे (रा. रावेर), अजय कोचुरे (रा. रावेर), गोकुळ भालेराव (रा. यावल) व फरार आरोपी संदीप उर्फ आप्पा कोळी (रा. यावल) यांच्यासह संगनमताने कामायनी एक्सप्रेसमध्ये प्रवाशाला मारहाण करून ४.५० लाख रुपये लुटले होते. या दरोड्याचा गुन्हा लोहमार्ग पोलीस ठाणे भुसावळ येथे आधीच दाखल आहे.
एलसीबी पथकाने आरोपींच्या कबुलीच्या आधारे १०० टक्के मुद्देमालासह चौघांना अटक केली असून पुढील तपासासाठी त्यांना लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या मोहिमेत पोलीस अधिकारी सोपान गोरे, प्रितम पाटील, यशवंत टहाकळे, बबन पाटील, सचिन घुगे, प्रदीप सपकाळे, मयुर निकम तसेच तांत्रिक सहाय्यक गौरव पाटील व मिलिंद जाधव यांनी सहभाग घेतला