DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅलीचे आयोजन

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

जळगाव – येथील गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे शहरात २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री आणि चरखा जयंतीनिमित्त ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. होणाऱ्या या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश गांधीजींच्या अहिंसा, सद्भावना आणि शाश्वत जीवनाच्या विचारांचा व्यापक जनसामान्यांपर्यंत प्रसार करणे हा आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक अशोक जैन यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
२ ऑक्टोबर हा विश्व अहिंसा दिवस म्हणून देखील साजरा होतो. या निमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅलीची सुरुवात सकाळी ७ वाजता शहरातील शास्त्री टॉवर चौकातून होईल. नेहरू चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. हेडगेवार चौक आणि बस स्टॅण्ड असे शहरातील प्रमुख चौकांमधून मार्गक्रमण करत महात्मा गांधी उद्यानात समारोपास पोहोचेल व भव्य कार्यक्रम, सभेत त्याचे रुपांतर होईल. या रॅली दरम्यान गांधी विचारांचे घोषवाक्ये, सामाजिक ऐक्याचे संदेश आणि जनजागृतीपर फलक नागरिकांचे लक्ष वेधतील. आयोजित कार्यक्रमास खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, माजी मंत्री सुरेशदादा जैन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल, कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्हि. एल. माहेश्वरी, माजी कुलगुरू डॉ के. बी. पाटील, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, राजेंद्र मयूर हे प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत.
गांधी उद्यानात होणाऱ्या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे प्रमुख पाहुणे असतील, यावेळी गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक आणि गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. सुदर्शन आयंगार यांच्याद्वारे अहिंसा प्रतिज्ञा उपस्थितांना देण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात गांधीतीर्थद्वारा घेतल्या गेलेल्या देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्याहस्ते पारितोषिके प्रदान करण्यात येतील. या यात्रेच्या माध्यमातून “बापूंच्या विचारांना सखोलपणे समजून घेत शाश्वत जीवनशैलीकडे वाटचाल करू या” असा प्रेरणादायी संदेश दिला जाणार आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.