महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घोषणा
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीनंतर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई दिली जाईल, असे आश्वासन आज (मंगळवार) लोकसभेत दिले.
लोकसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात शिवसेना नेते भुमरे एस. आसाराम यांच्या प्रश्नाला उत्तर देताना चौहान म्हणाले की, पिकांच्या झालेल्या नुकसानीचे बारीकसारीक मूल्यांकन करण्यासाठी पीक कापणी प्रयोग राबवला जाणार आहे. राज्याने हवामान-आधारित पीक विमा योजना स्वीकारली असल्यास या मूल्यांकनाच्या आधारे भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल, असेही ते म्हणाले.

चौहान यांनी सांगितले की, “मी स्वतः महाराष्ट्राचा दौरा केला आहे. पिकांचे झालेले नुकसान पाहिले आहे. केंद्र सरकार पीक विमा योजनेतून मदत वितरित करेल. तसेच एनडीआरएफच्या माध्यमातूनही राज्य सरकारला आवश्यक निधी देण्यात येईल.”
महाराष्ट्र सरकारचा नुकसानीचा अहवाल केंद्राकडे आला असून त्याआधारे राज्याला मदत तत्काळ दिली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. दुसऱ्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी २०२४-२५ या वर्षात विक्रमी पीक उत्पादन झाल्याचेही नमूद केले.
शेवटी, चौहान यांनी शेतकऱ्यांना पूर्ण मदत दिली जाईल, असे आश्वासन देताना सांगितले की राज्य सरकारने प्राथमिक भरपाईची प्रक्रिया सुरू केली असून केंद्र सरकारकडूनही आवश्यक ते सहकार्य मिळत राहील.