DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

महापालिका निवडणुकीवर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट मत; महायुतीचाच झेंडा फडकवणार

मुंबई | आगामी महापालिका निवडणुकांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे भाष्य केले आहे. मुंबई महापालिकेत महायुती म्हणून निवडणूक लढवण्याच्या निर्णयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा सुरू असताना, फडणवीस यांनी त्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
ते म्हणाले, “मला वाटत नाही की फार काही नाराजी आहे. कार्यकर्त्यांना जास्त संधी मिळाव्यात, अशी अपेक्षा असते, ती स्वाभाविक आहे. मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवणे आणि विकासमुख व पारदर्शक प्रशासन देणे. त्यासाठीच महायुतीचा निर्णय घेण्यात आला आहे.”
कल्याण-डोंबिवली महापालिकेबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भाजपामुळे शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा निराधार आहेत. “भाजप फक्त ५५ जागांचीच मागणी करेल, असे मला वाटत नाही. अशी कोणतीही मागणी अद्याप करण्यात आलेली नाही. मागील निवडणुकीत भाजपला ४२ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे आम्ही तिथे प्रमुख पक्ष आहोत. कल्याण-डोंबिवलीत शिवसेना आणि भाजप हेच दोन प्रमुख पक्ष असून तिसऱ्या पक्षाचे फारसे अस्तित्व नाही. जागावाटपाबाबत आम्ही आपापसात चर्चा करून निर्णय घेऊ,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, “अनेकवेळा अजित पवार बोलतात आणि त्याचा वेगळा अर्थ काढला जातो. मात्र संबंधित योजना ही पीएचडीसाठी खर्च परवडू न शकणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांसाठी आहे. जर एका घरातील पाच जणांनी लाभ घेतला, तर इतर गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना त्याचा फायदा मिळणार नाही. अजित पवारांनी व्यक्त केलेली चिंता योग्य आहे आणि या प्रकरणात योग्य तो निर्णय घ्यावा लागेल.”
शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाम शब्दांत सांगितले की, “यावेळी निवडणुका जिंकणे हाच आमचा फॉर्म्युला आहे.”
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीमुळे नाराजी असल्याच्या चर्चांवर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.