DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

केळी उत्पादकांवर पुन्हा संकट

थंडीचा पिकांना फटका, परतावा घटण्याची भीती

जळगाव | गेल्या तीन-चार महिन्यांपासून केळी पिकाला अपेक्षित भाव न मिळाल्याने जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नुकतीच बाजारभावात काहीशी सुधारणा दिसू लागली असताना, नुकसानीतून सावरू पाहणाऱ्या केळी उत्पादक शेतकऱ्यांवर पुन्हा एक नवे संकट ओढावले आहे. सध्या जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडत असून या थंडीचा थेट फटका केळी पिकाला बसत आहे. त्यामुळे केळी उत्पादकांपुढे नवे आव्हान उभे राहिले आहे. मात्र दुसरीकडे थंडीचा रब्बी पिकांना फायदा होताना दिसत आहे.
गेल्या दोन-तीन महिन्यांत केळीचे बाजारभाव अत्यंत खालच्या स्तरावर गेले होते. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. मागील पंधरवड्यात भावात काही प्रमाणात सुधारणा दिसून आली होती; मात्र आता वाढत्या थंडीमुळे केळी उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. थंडीमुळे बाजारात दर्जेदार मालाचे प्रमाण कमी होण्याची, घडाचे वजन घटण्याची तसेच फळाची लांबी व जाडी कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या परताव्यात घट होण्याचा इशारा व्यापारी व कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

असा जाणवतोय थंडीचा फटका
थंडीमुळे केळी पिकाच्या वाढीवर मोठा परिणाम होतो. विशेषतः तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेल्यास केळीची नैसर्गिक वाढ थांबते, परिणामी उत्पादन घटते. थंडीची झळ बसल्याने पानांची वाढ खुंटते, पानांची टोके सुकू लागतात तसेच पानांवर काळपटपणा दिसून येतो. याशिवाय थंड वातावरणात करपा सारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, तो केळी पिकासाठी घातक ठरतो. डीच्या काळात पाण्याच्या व्यवस्थापनाचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जास्त पाणी दिल्यास मुळांना इजा होण्याचा धोका असतो, तर कमी पाणी दिल्यास झाडे कोमेजण्याची शक्यता असते. या दुहेरी कोंडीत केळी उत्पादक शेतकरी सापडले असून, पुढील काही दिवस पिकासाठी निर्णायक ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.