DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगाव मनपा निवडणूक : भाजपची युती की बंडखोरांची पुनरावृत्ती?

जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची राजकीय रणधुमाळी सुरू झाली असून शहरातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. मागील महानगरपालिका निवडणुकीत जळगावकर मतदारांनी भाजपला स्पष्ट बहुमत देत एकहाती सत्ता बहाल केली होती. मात्र, नंतर भाजपमधील अंतर्गत बंडखोरीमुळे अडीच वर्षांतच सत्ता हातातून निसटली आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेने मनपावर ताबा मिळवला होता. आता पुन्हा निवडणुका तोंडावर असताना, त्याच बंडखोरांशी भाजप यावेळीही युती करणार का, असा सवाल शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.
सध्या जळगाव मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेकडून उमेदवारांची चाचपणी व मुलाखती सुरू आहेत. यंदाही दोन्ही पक्षांमध्ये युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र 2017 च्या निवडणुकीची आठवण अजूनही जळगावकरांच्या मनात ताजी आहे. त्या वेळी नागरिकांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपला मोठे यश दिले होते.
तरीही, भाजपने अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी दिली. मतदारांनी त्या नव्या उमेदवारांवर विश्वास टाकला; मात्र याच उमेदवारांनी अडीच वर्षांत बंडखोरी करत भाजपशी दगाफटका केला. परिणामी भाजपची सत्ता कोसळली आणि ठाकरे गटाने मनपावर सत्ता स्थापन केली.
आता पुन्हा एकदा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, ज्यांनी भाजपची सत्ता उलथवून टाकली त्या बंडखोर उमेदवारांना यंदाही भाजपकडून पाठबळ दिले जाणार का, याबाबत नागरिकांमध्ये तीव्र चर्चा सुरू आहे. शिंदे गटासोबत युती होण्याची शक्यता जरी असली, तरी भाजपशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्ते व मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
यंदाच्या निवडणुकीत नेमका कोणावर विश्वास ठेवायचा, हा प्रश्न भाजप समर्थक मतदारांसमोर उभा राहिला असून, जळगावच्या राजकारणात पुढील काळात कोणते नवे समीकरण तयार होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.