DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला प्रारंभ, जागावाटपावर महायुतीत खलबतं

मुंबई :  महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असून, आजपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीतील हालचालींना चांगलाच वेग आला आहे. सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची सुमारे दोन तास बैठक झाली. या बैठकीत मुंबईतील एकूण २२७ जागांपैकी १५० जागांवर तिन्ही घटक पक्षांमध्ये एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र उर्वरित ७७ जागांवर अद्याप तिढा कायम असून, तो सोडवण्यासाठी आज दिवसभर बैठकांचे सत्र सुरू राहणार आहे.

७७ वादग्रस्त जागांवर सखोल चर्चा
सूत्रांच्या माहितीनुसार, या संयुक्त बैठकीपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजप नेत्यांसोबत मुंबईतील प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्र आढावा घेतला होता. त्यानंतर झालेल्या महायुतीच्या चर्चेत ७७ वादग्रस्त जागांवर सविस्तर चर्चा झाली. यापैकी सुमारे ३० ते ३५ जागांवरील मतभेद रात्रीच मिटल्याचे सांगितले जात आहे. उर्वरित जागांवर उद्या दुपारपर्यंत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

नातेवाईकांना तिकिटाचा आग्रह, कोअर कमिटी नाराज
या बैठकीतील सर्वात संवेदनशील मुद्दा म्हणजे आमदारांच्या नातेवाईकांचा तिकिटासाठीचा आग्रह. वडाळा, प्रभादेवी, चेंबूर, बोरीवली आणि अंधेरी यांसारख्या महत्त्वाच्या भागांमध्ये विद्यमान आमदारांच्या नातेवाईकांनी उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र यामुळे शिवसेना आणि भाजपच्या कोअर कमिटीत नाराजीचा सूर उमटला आहे. केवळ नातेवाईकांनाच प्राधान्य दिल्यास सामान्य कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल, त्यामुळे निष्ठावान आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, असा स्पष्ट पवित्रा नेत्यांनी घेतला आहे.

मराठी पट्ट्यावर शिवसेनेचा दावा
शिवसेनेने मुंबईतील पारंपरिक मराठी बहुल भागांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. दादर, परळ आणि लालबाग या परिसरात शिवसेनेला अधिक जागा देण्यात याव्यात, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. या भागातील मराठी मतदार भाजपकडे झुकणार नाहीत आणि येथे शिवसेनेचाच प्रभाव राहील, असा युक्तिवाद शिवसेना नेत्यांनी मांडला.

आज निर्णायक बैठका
वर्षा निवासस्थानी झालेल्या चर्चेनंतर आज सकाळी १० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नंदनवन या शासकीय निवासस्थानी शिवसेनेच्या कोअर कमिटीची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मुंबईतील जागावाटपावर अंतिम निर्णय अपेक्षित आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार की महायुतीतच राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज दुपारी ४ वाजता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पत्रकार परिषदेत पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर करणार आहेत. सर्व वाद मिटल्यास उद्या दुपारपर्यंत मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या संपूर्ण जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.