शाळेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह; पाच वर्षीय मुलीवर अत्याचार
मुंबई | मुंबईतील मालाड परिसरातून एक धक्कादायक आणि चिंताजनक प्रकार समोर आला आहे. मालाडमधील एका नामांकित शाळेत अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीवर शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणामुळे पालकवर्गात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ही घटना १२ जानेवारी रोजी शाळेच्या आवारात घडली. संबंधित शिपायाने मुलीला धमकावत व भीती दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर भीतीपोटी मुलीने बराच काळ कोणालाही हा प्रकार सांगितला नाही.

दरम्यान, काही दिवसांनंतर मुलीच्या वागण्यात झालेल्या बदलांमुळे पालकांना संशय आला. त्यांनी विचारपूस केली असता, मुलीने रडत संपूर्ण प्रकार कथन केला. त्यानंतर पालकांनी ६ फेब्रुवारी रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रार केल्यानंतर पालकांनी शाळा प्रशासनाकडे जाब विचारला असता, त्यांना उलट धमकावण्यात आल्याचा गंभीर आरोपही पालकांनी केला आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शाळेचा शिपाई अनिल पांचाळ (वय ३०) आणि शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अनंत यज्ञीक (वय ६५) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ७४, ३५१ (२) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम १०, १७ आणि २१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोघांनाही अटक करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
शाळेसारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडल्याने मालाड परिसरातील पालक आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शाळा प्रशासनाच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.