नवी दिल्ली | भारत आणि अमेरिका यांच्यात बहुचर्चित व्यापार करार अखेर पूर्ण झाला असून, या करारानंतर अमेरिकेने भारतावरील टॅरिफमध्ये कपात केली आहे. त्याचवेळी भारतानेही अमेरिकेला व्यापाराच्या बाबतीत विविध सवलती देण्यास सहमती दर्शवली आहे. या पार्श्वभूमीवर आता भारताकडून रशियाकडील कच्च्या तेलाची खरेदी हळूहळू कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तेल खरेदी कमी करण्याबाबत अनौपचारिक संकेत
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी केल्यानंतर भारतातील तेल कंपन्यांना रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी टप्प्याटप्प्याने कमी करण्याबाबत अनौपचारिक सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, याबाबत अद्याप कोणताही थेट किंवा अधिकृत आदेश देण्यात आलेला नाही. नायरा एनर्जी यासारख्या काही रिफायनरी कंपन्या सध्या तरी रशियाकडून तेल खरेदी पूर्णपणे थांबवणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

भारत–अमेरिका व्यापार करार होण्यापूर्वीच काही भारतीय तेल कंपन्यांनी रशियाकडून तेल खरेदी कमी केल्याचेही समोर आले आहे.
काही कंपन्यांनी आधीच खरेदी थांबवली
अमेरिकेने रशियावर निर्बंध जाहीर केल्यानंतर हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL), मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (MRPL) आणि HPCL–मित्तल एनर्जी लिमिटेड (HMEL) यांनी रशियाकडून तेल खरेदी बंद केली होती.
याशिवाय, इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOC) आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) या कंपन्याही आगामी काळात रशियाकडून तेल खरेदी हळूहळू थांबवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
दरम्यान, देशातील सर्वात मोठी खासगी तेल खरेदी करणारी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडही रशियाकडून तेल खरेदी बंद करण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत कंपनीला रशियाकडून सुमारे १,५०,००० बॅरल्स तेल मिळणार असून, हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर पुढील खरेदी थांबवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.