णमोकार तीर्थवर मुख्यमंत्री फडणवीस; पंचकल्याणक महोत्सवात भक्तीचा संगम
नाशिक | नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील मालसाणे येथे सुरू असलेल्या जैन धर्मीयांच्या पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवाला शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांचीही उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांनी जैन मुनींचे दर्शन घेत त्यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन स्वीकारले.
मालसाणे येथील णमोकार तीर्थक्षेत्रात सुरू असलेल्या पंचकल्याणक महोत्सवाचा शनिवारी दुसरा दिवस होता. या निमित्ताने देशभरातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार प्रफुल पटेल यांनी गणधराचार्य १०८ श्री कुंथुसागरजी महाराज आणि सारस्वताचार्य १०८ श्री देवनंदीजी महाराज यांचे दर्शन घेतले. यावेळी जैन मुनींनी दोन्ही नेत्यांना आशीर्वाद देत धार्मिक मार्गदर्शन केले.

णमोकार तीर्थासाठी भरीव मदतीची मागणी
या वेळी खासदार प्रफुल पटेल म्हणाले की, “कुंथुसागरजी महाराज आणि देवनंदीजी महाराज यांचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. णमोकार तीर्थ हे पवित्रता आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. दिगंबर जैन समाज संख्येने कमी असला तरी देशाच्या जडणघडणीत नेहमीच अग्रस्थानी राहिला आहे. त्याग, तपस्या आणि साधनेचा आदर्श घालून देणाऱ्या गुरुजनांना मी नमन करतो. णमोकार तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी राज्य सरकारने भरीव मदत करावी,” अशी मागणी त्यांनी केली.
भक्तिभावात सुरू असलेला पंचकल्याणक महोत्सव
चांदवड तालुक्यातील मालसाणे येथील णमोकार तीर्थ येथे सुरू असलेला पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव मोठ्या भक्तिभावात पार पडत आहे. प्रशासनातर्फे कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या महोत्सवात शनिवारी सकाळी ६.३० वाजता यज्ञशाळेत अभिषेक व हवनाने दिवसाची सुरुवात झाली. भगवान जन्मकल्याणक विधीसह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
पाच मुमुक्षूंनी अंगीकारली जैनेश्वरी दीक्षा
श्री णमोकार तीर्थच्या प्रांगणात सुरू असलेल्या पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी एक ऐतिहासिक व भावस्पर्शी सोहळा पार पडला. त्याग आणि वैराग्याची अनुभूती देणाऱ्या या कार्यक्रमात पाच मुमुक्षूंनी संसाराचा त्याग करून ‘जैनेश्वरी दीक्षा’ अंगीकारली.
गणधराचार्य १०८ श्री कुंथुसागरजी महाराज, सारस्वताचार्य १०८ श्री देवनंदीजी महाराज तसेच अनेक दिगंबर मुनीराज व आर्यिका माताजींच्या सान्निध्यात हे दीक्षा संस्कार संपन्न झाले. या प्रसंगी तीर्थक्षेत्र भक्तांनी फुलून गेले असून, संपूर्ण परिसर भक्तिभाव आणि आध्यात्मिक ऊर्जेने भारावून गेला.