देशभर हवामानाचा बदलता रंगच; कुठे पाऊस, कुठे थंडी तर कुठे उकाडा
राज्यासह देशातील हवामानात सध्या मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. फेब्रुवारी महिन्यातच काही ठिकाणी पावसाची शक्यता निर्माण झाली असून अनेक भागांत उकाडाही जाणवत आहे. राज्यातून थंडी जवळपास कमी झाली असली तरी उत्तरेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी कायम आहे.
नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून ते 10.4 अंश सेल्सिअस इतके आहे. दरम्यान, दुपारच्या तापमानात 2 ते 3 अंशांची घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील काही भागांत आज ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.

भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तर राजस्थान, छत्तीसगड आणि बिहार या राज्यांमध्ये तापमान 5 ते 10 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले गेले असून थंडीची लाट कायम आहे.
दरम्यान, मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा खालावली आहे. शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 204 वर पोहोचला असून तो “वाईट” श्रेणीत आहे. पीएम 10 चे प्रमाण 180 तर पीएम 2.5 चे प्रमाण 151 इतके नोंदवले गेले आहे. त्यामुळे दृष्यमानतेवरही परिणाम दिसून येत आहे.
मुंबईत सकाळच्या वेळी धुरकट वातावरण राहण्याची शक्यता असून दुपारी आकाश निरभ्र राहील. कमाल तापमान सुमारे 35 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता असल्याने उष्णतेची तीव्रता जाणवू शकते.
पुढील 48 तासांत किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट होण्याची शक्यता असल्याने राज्यात पुन्हा थंडी वाढण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. एकूणच, देशभरात काही ठिकाणी मुसळधार पाऊस, काही भागांत कडाक्याची थंडी तर इतर भागांत उकाडा अशा संमिश्र हवामानाचा अनुभव येत आहे. हवामानातील या सततच्या बदलांचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होत असल्याचे दिसून येत आहे.