DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

मधमाश्यांच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू; यावल शहरात शोककळा

यावल (प्रतिनिधी) : यावल शहराजवळील निमगाव शिवारात मधमाश्यांच्या हल्ल्यात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (१० फेब्रुवारी २०२६) दुपारी घडली. या घटनेमुळे शहरासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश रविंद्र पाटील (वय ३८, रा. देशमुख वाडा, यावल) हे दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास खुबसिंग नयनसिंग पाटील यांच्या मालकीच्या निमगाव शिवारातील शेतात काम करत होते. काम सुरू असताना शेतातील एका झाडावर असलेल्या मधमाश्यांच्या पोळ्यात अचानक हालचाल झाली आणि मोठ्या संख्येने मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.

या हल्ल्यात गणेश पाटील गंभीर जखमी झाले. मधमाश्यांच्या चाव्यांमुळे त्यांची प्रकृती झपाट्याने बिघडली आणि ते बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची माहिती राहुल रमेश झामरे (वय ३३) यांनी दिल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

गणेश पाटील हे रविंद्र पाटील कुटुंबातील एकुलते एक पुत्र होते. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा मोठा आघात झाला असून देशमुख वाडा परिसरासह संपूर्ण यावल शहरात शोककळा पसरली आहे. नागरिकांकडून पाटील कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या जात आहेत.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.