पळसखेडे मिराचे येथे समृद्ध शेती विषयावर कृषी मेळावा उत्साहात
पळसखेडे मिराचे : डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील कृषीदूतांच्या पुढाकारातून पळसखेडे येथे आयोजित करण्यात आलेला “समृद्ध शेती” या संकल्पनेवर आधारित कृषी मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संध्याकाळी ५ वाजता झालेल्या या मेळाव्यास परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मेळाव्यात कापूस, मका आणि केळी या प्रमुख पिकांवरील आधुनिक शेती तंत्रज्ञान, संतुलित खत व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण तसेच शाश्वत आणि बाजाराभिमुख शेती पद्धतींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आणि प्रश्नोत्तर सत्रामुळे शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. बी. एम. गोणशेटवाड (RAWE & AIA कार्यक्रम समन्वयक, कृषी विस्तार शिक्षण विभाग) यांनी केले. तालुका कृषी अधिकारी श्री. जितेंद्र पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पळसखेडा येथील सरपंच आशाताई संजय पवार होत्या. सूत्रसंचालन कृषीदूत रोशन नरोडे आणि सिद्धेश जैन यांनी केले.
यावेळी प्रा. पी. एस. देवरे (RAWE & AIA कार्यक्रम अधिकारी), प्रा. बी. एम. गोणशेटवाड, डॉ. प्रीती दातीर (सहाय्यक प्राध्यापिका, कृषी विस्तार शिक्षण विभाग) तसेच उद्यानविद्या तज्ज्ञ प्रा. के. ए. बनसोडे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती चंद्रशेखर काळे, मोहाडी गावाचे सरपंच दत्तात्रय पाटील, पळसखेडा उपसरपंच संदीप काळे आणि प्रगतशील शेतकरी भरतसिंग राजपूत उपस्थित होते.
मार्गदर्शक म्हणून तुकाराम निकुले व प्रगतशील शेतकरी अनिल चौधरी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. प्रा. शरद पाटील (जामनेर) यांनी कृषीदूतांना मार्गदर्शन केले. कृषीदूत अमन मोगल, किरण इंगळे आणि ऋषिकेश निळे यांनी “समृद्ध शेती” या विषयावर शेतकऱ्यांना माहिती दिली.
या मेळाव्याचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक व समृद्ध शेती पद्धती प्रभावीपणे राबवण्यासाठी सक्षम करणे हा होता. या मार्गदर्शनामुळे उत्पादनवाढीसह खर्चात बचत होण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शेतकरी आणि ग्रामस्थांनी कृषीदूतांचे कौतुक केले. शेवटी प्रा. बी. एम. गोणशेटवाड यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.