लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव
नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात मंगळवारी विरोधी पक्षांकडून अविश्वास प्रस्तावाची नोटीस सादर करण्यात आली. या प्रस्तावावर एकूण ११८ खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्याची माहिती समोर आली आहे.
वृत्तसंस्था आयएएनएसने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रस्तावावर निर्णय होईपर्यंत ओम बिर्ला लोकसभेच्या कामकाजापासून दूर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रस्ताव फेटाळल्यानंतरच ते पुन्हा अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारतील, असा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, या अविश्वास प्रस्तावावर ९ मार्च रोजी लोकसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस १३ फेब्रुवारी असून त्यानंतर संसदेचे कामकाज ८ मार्चपासून पुन्हा सुरू होणार आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी संसदेला दोन वेळा तहकूब करावे लागले होते. त्यामुळे दुपारी २ नंतर कामकाज पुन्हा सुरू झाले. त्यावेळी खासदार शशी थरूर यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरुवात केली.