जामनेर तालुक्यावर पुन्हा अवकाळीचा घाला
मंत्री गिरीष महाजन, तहसिलदारांकडून नुकसानीची पाहणी
जामनेर : तालुक्यातील लोणी, मादणी, महुखेडा, गारखेडा या गावांसह अनेक गावांना अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. या गावांना मंत्री ना. गिरीष महाजन यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. त्यांनी आणि तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी संबंधित विभागाला पंचनामा करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मिळाली आहे. शेतकऱ्यांना नुकसानाची भरपाई लवकरात लवकर मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
तालुक्यातील लोणी येथील बहुतांश शेतकरी आणि शेतमजुरांचे घरावरील पत्रे उडाले आहे. काही शेतकऱ्यांच्या घरात ठेवलेला कापूस पत्रे उडाल्यामुळे भिजला आहे. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लोणी गावातील मोतीराम उगले यांची गाय व दशरथ म्हस्की यांच्या बैलचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. येथीलच पुंडलीक आहेर, ज्ञानेश्वर चोपडे, विनोद गोंधळी, देवराव वाघ, सुरेश मिस्तरी यांच्या घरांवरील पत्रे उडाले आहे. तसेच घरांची पडझड झालेली आहे. तसेच काशीनाथ आहेर यांच्या गुरांच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे. अनंत वाणी आणि दगडु किरोते यांच्या केळी बागाचे नुकसान झाले आहे. सुनील आहेर यांचे मका पीक आडवे झाले आहे. तसेच अनिल न्हावी यांचे राहते घर पडले असून रघुनाथ आहेर यांची गाय जखमी झाली आहे. या भागाचा तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी नुकसानीचा आढावा घेतला आहे. तसेच तालुक्यातील गारखेडा, महुखेडा येथील शेतकऱ्यांचे केळी, मका पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.