DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

भाजप खासदार उन्मेष पाटील यांचा उद्या ठाकरे गटात प्रवेश

जळगाव : जळगावच्या राजकारणात आता मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. कारण भाजपचे सध्याचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील उद्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. उन्मेष पाटील यांची ही नाराजी भाजपला डोकेदुखी ठरू शकते. कारण उन्मेष पाटील यांची चाळीसगावात चांगली ताकद आहे.
दरम्यान, जळगावच्या राजकारणात आता मोठा ट्विस्ट येणार आहे. कारण सध्याचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील हे आता ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

भाजपकडून उन्मेष पाटील यांचं लोकसभा निवडणुकीचं तिकिट कापण्यात आलं आहे. त्यामुळे उन्मेष पाटील नाराज असल्याची चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्या दुपारी बारा वाजता उन्मेष पाटील यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश होणार आहे. त्यांच्यासोबत पारोळाचे माजी नगराध्यक्ष करण पवार हे सुद्धा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

उन्मेष पाटील यांनी आज सकाळी जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केल्याची माहिती समोर येत आहे.

उन्मेष पाटील हे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार आहेत. त्यांनी याआधी २०१४ मध्ये आमदारकीची निवडणूक लढवली होती आणि ते चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात आमदार होते. मात्र यावेळी उन्मेष पाटील यांना भाजपकडून जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारी न मिळता स्मिता वाघ यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे उन्मेष पाटील नाराज असल्याची चर्चा होती. याच नाराजीतून त्यांनी आज ठाकरे गटाच्या नेत्यांची भेट घेतली आहे.

महाविकास आघाडीत जळगाव लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटासाठी सुटला आहे. ठाकरे गटाकडून या जागेसाठी उमेदवाराची घोषणा झालेली नाही. जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे नेते हर्षल माने, नुकतेच भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश केलेल्या नेत्या ललिता पाटील आणि इतर काही इच्छुक उमेदवारांची नावे चर्चेत होती. मात्र उन्मेष पाटील आणि करण पवार हे जर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत असतील तर जळगाव लोकसभा मतदारसंघातून नेमकी उमेदवारी शिवसेना ठाकरे गटाकडून कोणाला मिळते ते पाहावे लागेल.

संजय राऊत हे उन्मेष पाटील यांचे मित्र : स्मिता वाघ यांची प्रतिक्रिया
संजय राऊत हे उन्मेष पाटील यांचे मित्र असल्यामुळे त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी उन्मेष पाटील हे गेले आहेत. त्यामुळे मला अजूनही असं वाटतं की उन्मेष पाटील हे असा काही निर्णय घेणार नाहीत. मी प्रचारामध्ये आहे. त्यामुळे मी अशी कुठली बातमी बघितली नाही. मात्र माझा अजूनही ठाम विश्वास आहे की अशा कुठल्याही घडामोडी या घडणार नाहीत. कोणी कसं जीवन जगावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. मात्र मी माझ्या तत्त्वांशी आजपर्यंत तडजोड केली नाही. एकनिष्ठ राहिले. पक्षासोबत एकनिष्ठ राहणा-या माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी जनता ही उभी राहील, अशी प्रतिक्रिया स्मिता वाघ यांनी दिली.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.