भाजप खासदार उन्मेष पाटलांच्या हाती ‘मशाल’; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांमध्ये इनकमिंग-आऊटगोईंग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव भाजपाचे वरिष्ठ नेते आणि खासदार उन्मेष पाटील यांना भाजपने उमेदवारी न दिल्याने ते नाराज होते. काल त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर उन्मेष पाटील हे ठाकरे गटात प्रवेश करणार अशा चर्चा होत्या. अखेर आज या चर्चांना पूर्णविराम मिळाला. उन्मेष पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
ठाकरे गटात पक्षप्रवेश केल्यावर उन्मेष पाटील भाजपावर नाव न घेता टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, ही पदाची, जय-विजयाची लढाई नाही तर ही स्वाभिमानाची आणि आत्मसन्मानाची लढाई आहे. मला उमेदवारी मिळालेली नाही म्हणून मी ही भूमिका घेतलेली नाही. पण राजकारणात काम करताना मान सन्मान नाही मिळाला, कोणतंही पद नाही मिळालं तरी चालेल, पण नेत्यांचा स्वाभिमान सांभाळला जात नसेल आणि अवहेलना केली जात असेल तर लाचार होऊन राजकारण करणं योग्य नाही, असे म्हणत उन्मेष पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला.
उन्मेष पाटील म्हणाले की, उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज झालो का? असं मला विचारलं जातं. पण राजकारणात आमदार आणि खासदार होणं हे सोपं नव्हतं. काम करत असताना शासकीय योजनांचा पॅटर्न आता सुरू आहे, तो आपण जळगावात सुरू केला होता. कोणतीही चिरीमिरी न देता सुरू केला आहे. कधीही लोकांना पैसे देऊन आणलं नाही. पण पॉलिसी मेकरची किंमत नाही. काम करणाऱ्यांची कदर नाही. मला न विचारता दुसऱ्यांना लोकसभेची उमेदवारी दिली गेली, असा आरोप उन्मेष पाटील यांनी केला.
देशातील पहिल्यांदा निवडून आलेल्या 292 खासदारांमध्ये चांगलं काम करणाऱ्यामध्ये माझं नाव होतं. मी प्रामाणिकपणे काम केलं. जनता आणि संसदेतील दुवा म्हणून काम केलं. मला बदला घेण्यासाठी पद दिलं नाही, तर मी बदल करण्यासाठी काम केलं होतं. बदल्याचं राजकारण त्रास देणारं होतं. त्याचा राग येत होता, वेदना होत होत्या. बदल करण्याऐवजी बदल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये रुजवली जात आहे. त्या पापाचे वाटेकरी होऊ नये म्हणून मी वेगळा होण्याचा विचार केला. बैठकीला न बोलावणं आणि अपमान करणं हे प्रकार सुरूच होते. म्हणून स्वाभिमान गहाण न ठेवण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरेंनी स्वाभिमानाची लढाई सुरू केली आहे. त्यात सामील होण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. उत्तर महाराष्ट्रात आम्ही शिवसेना रुजवू, असा विश्वास उन्मेष पाटील यांनी व्यक्त केला.