जैन मुनींची निर्घृण हत्या; मृतदेहाचे तुकडे करून टाकले कूपनलिकेत
चिक्कोडी : रायबाग जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील नंदीपर्वत आश्रमाच्या जैन मुनींची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रायबाग तालुक्यातील कटकभावी येथे शेतातील कूपनलिकेत दोघांनी मठातच मुनींची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे करून टाकले होते. पोलिसांनी शनिवारी तेथे खोदाई करून मृतदेहाचे काही अवशेष बाहेर काढले. आचार्य श्री १०८ कामकुमार नंदी महाराज असे हत्या झालेल्या जैन मुनींचे नाव आहे. हिरेकुडी येथे नंदीपर्वत आश्रम आहे. या आश्रमाचे मुनी आचार्य श्री १०८ कमकुमार नंदी महाराज आहेत. दोन दिवसांपासून ते आश्रमातून अचानक गायब झाले. ते कोणाच्याही निदर्शनास आले नाहीत. त्यामुळे भाविकांनी त्यांचा सर्वत्र शोध सुरू केला होता.
परिसरातील आश्रमांतही ते शोधून सापडले नसल्याने शुक्रवारी सकाळीच आश्रमाच्या ट्रस्टीकडून मुनी महाराज बेपत्ता झाल्याची फिर्याद पोलिसांत दिली होती. त्यानंतर चिक्कोडी पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला. सहा जून रोजी सकाळी आठ वाजल्यापासून ते बेपत्ता असल्याने भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. पाच जुलैला रात्री १० वाजेपर्यंत जैन मुनी आश्रमातील त्यांच्या खोलीत होते. नंदीपर्वत आश्रमात गेल्या १५ वर्षांपासून हे जैन मुनी राहतात. दोन दिवसांपासून ते आश्रमात दिसले नव्हते. त्यांनी पिंची, कमंडलू आणि मोबाईल तेथेच सोडला होता. जैन मुनी जिथे जायचे तिथे पिंची आणि कमंडलू सोबत घेऊन जात होते, असे असताना या सर्व वस्तू खोलीत असल्याने भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. त्यानुसार पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन तपास गतीने सुरू केला.