मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदार अपात्र ठरणार?
१४ जुलैला सर्वोच्च न्यायालयात मोठ्या निर्णयाची शक्यता
मुंबई : ठाकरे गटाकडून आमदार सुनील प्रभू यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. ठाकरे गटाच्या या याचिकेवर आता १४ जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांच्या निलंबनाबाबत दाखल असलेल्या याचिकेवर लवकर निर्णय घेण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. यासह विधानसभा अध्यक्षांना निलंबनाबाबत निर्देश द्या अशी मागणी देखील याचीकेत करण्यात आली होती.
अडीच महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्याचा अधिकार दिला होता. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र करण्याबाबत योग्य तो निकाल देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मात्र या निर्णयासाठीची वेळ ठरवून देण्यात आली नव्हाती.
अशात सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश देऊन आता अडीच महिन्यांचा कालावधी झाला आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
अशात शनिवारी ठाकरे आणि शिंदे गटाच्या दोन्ही आमदारांना आपली कागदपत्रे सादर करत आपलं म्हणणं मांडण्यास विधानसभेच्या अध्यक्षांनी सांगिलं होतं. त्यावर आता १४ जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणी दरम्यान काय होणार याकडे साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.