चाळीसगावला १२०० गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप
ना.गिरीष महाजनांसह मान्यवरांची कार्यक्रमाला उपस्थिती
चाळीसगाव : आपल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांसाठी नेहमी चर्चेत असणारे जिल्हा दूध संघाचे चेअरमन तथा चाळीसगावचे आ.मंगेश चव्हाण यांच्यातर्फे चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी स्व.रामराव जिभाऊ पाटील विद्यार्थी सन्मान शिष्यवृत्ती योजना सुरु केली आहे. त्याअंतर्गत चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील १ हजार २०० अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वितरणाचा समारंभ मंगळवारी, १२ सप्टेंंबर रोजी दुपारी ४ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदानात पार पडला.
यावेळी राज्याचे ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांंच्याहस्ते गरजू विद्यार्थ्यांना सायकल भेट देण्यात आली. अध्यक्षस्थानी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार आदी मान्यवर उपस्थित होते.
ना.गिरीश महाजन यांनी ज्याप्रमाणे आजवर दिनदुबळ्यांची सेवा केली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवण्याचा आपला प्रयत्न असल्याचे प्रतिपादन आ.मंगेश चव्हाण यांनी केले. आ.मंगेश चव्हाण यांनी माझ्या पावलावर पाऊल ठेवण्याचा संकल्प केला असला तरी ते करत असलेली समाजसेवा पाहून मलाच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालावेसे वाटते, अशा शब्दांमध्ये ना. गिरीश महाजन यांनी आ.मंगेश चव्हाण यांच्या कार्याचे कार्यक्रमात कौतुक केले.