DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगावातील झुलेलाल वॉटर पार्कमध्ये कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना मारहाण

जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या झुलेलाल वॉटर पार्कमध्ये फिरण्यास गेलेल्या कुटुंबीयांना त्याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भवानी पेठ परिसरात राहणारा आर्यन प्रीतेश भावसार वय-१९ हा तरुण सोमवारी रात्री आपल्या कुटुंबीयांसह शिरसोली रस्त्यावरील झुलेलाल वॉटर पार्कमध्ये फिरण्यास गेला होता. रात्री ९.४५ च्या सुमारास आर्यनचा चुलत भाऊ ओम भावसार याचा त्याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत कपडे बदलण्यावरून वाद झाला. वाद वाढत असल्याने आर्यन तिथे गेला असता त्यांना आर्यनचा कॅमेरा फेकून दिला तसेच काऊंटरवर बसलेल्या ३-४ जणांनी त्याला बेदम मारहाण केली.

 

आर्यनला काठ्यांनी कर्मचारी मारहाण करीत असल्याचे पाहून त्याचे आई, वडील, काका, भाऊ आणि इतर नातेवाईक मदतीसाठी धावले असता कर्मचाऱ्यांनी त्यांना देखील शिवीगाळ व मारहाण केली. मारहाणीत आर्यनच्या तोंडाला आणि पायाला मार लागला असून इतरांना देखील किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच परिरक्षावधिन उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार यांनी कर्मचाऱ्यांसह धाव घेत सर्व माहिती घेतली. वॉटर पार्कमध्ये असलेल्या सीसीटिव्ही फुटेजची पाहणी करून त्यांनी नागरिकांना पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी बोलाविले.

पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांनी सर्व हकीकत समजून घेत फिर्याद देण्यास सांगितले. आर्यन भावसार याने दिलेल्या फिर्यादीवरून झुलेलाल वॉटर पार्कमधील ४ कर्मचाऱ्यांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार जितेंद्र राठोड करीत आहेत.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.