आंतरराज्य वरिष्ठ महिला टि-२० क्रिकेट स्पर्धेतील सामन्यांचे निकाल
जळगाव ;- महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस् अॅकॅडमी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धा जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूल येथे सुरू आहेत. वरिष्ठ गटाच्या या स्पर्धेत महाराष्ट्र, तामिळनाडू, त्रिपुरा, पश्चिम बंगाल या राज्याचे संघ सहभागी असुन आतापर्यंत पश्चिम बंगाल संपूर्ण स्पर्धेत अव्वल स्थानावर कायम आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)तर्फे घेण्यात येणाऱ्या आंतरराज्य महिला वरिष्ठ गटाच्या स्पर्धेपुर्वी जळगावात प्रथमच होणाऱ्या यास्पर्धेकडे राष्ट्रीय स्पर्धेची पुर्व तयारी स्पर्धा म्हणून बघितले जात आहे.
सामन्यांचे निकाल
स्पर्धेतील चौथा सामना महाराष्ट्र विरूद्ध तामिळनाडू यांच्यात काल (दि.१८) ला सुरू होता. महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकात सर्वबाद १०० धावा केल्यात. तामिळनाडूने १.२ षटकात बिनबाद ५ धावा केला त्यावेळी सामना पावसामुळे थांबविण्यात आला. उर्वरित सामना त्याच षटकापासून सुरू करण्यात आला. १०० धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी उतरलेल्या तामिळनाडू संघाच्या फलंदाजांनी आपल्या नावे केला. शेवटच्या षटकांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात तामिळनाडूच्या निरंजना नागराजन ४७ (४५ चेंडू) धावा नाबाद करून संघाला एकहाती विजय मिळवून दिला. सामनाविरचा पुरस्कारही निरंजना नागराजन हिला प्राप्त झाला. शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या अंजली पाटील (व्हॉलीबॉल) यांच्याहस्ते सामनाविर पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी रविंद्र धर्माधिकारी, सय्यद मोहसीन उपस्थित होते. मुश्ताक अली यांनी सुत्रसंचालन यांनी केले.
पश्चिम बंगालचा तिसरा विजयी
आजच्या पहिल्या सामना महाराष्ट्र विरूद्ध पश्चिम बंगाल यांच्यात रंगला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. बंगालने निर्धारित २० षटकांत कशिश अग्रवाल ५४ (४१ चेंडू) धावा केल्यात तिला ब्रिस्टी माजही ४१ (४२ चेंडू) धावा साथ दिली. प्रणा पॉल हिने २७ धावांची उपयुक्त खेळी करून धावगती वाढवली. बंगालने निर्धारित २० षटकांत ४ गडी गमावून १४५ केल्यात. १४५ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या महाराष्ट्र संघाला किरण नवगिरे ४० (४८ चेंडू) धावा व ईश्वरी सावकार ३३ (४१ चेंडू) धावा यांनी दमदार सुरूवात करून दिली. दोघं ही बाद झाल्यावर महाराष्ट्र संघाची धावगती मंदावली. शिवाली शिंदे २८ हिने आक्रमक खेळ करित धावगती वाढविण्याचा प्रयत्न केला परंतु तिला इतर फलंदाजांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. महाराष्ट्र संघ निर्धारित २० षटकात ७ गडींच्या मोबदल्यात १२७ धावा करू शकला. बंगाल संघ १८ धावांनी विजयी झाला. सामनावीरचा पुरस्कार बंगालच्या कशिश अग्रवाल हिला देण्यात आला. सामनावीर पुरस्कार अनुभूती स्कूलचे प्राचार्य देबासीस दास यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी रविंद्र धर्माधिकारी, सय्यद मोहसीन उपस्थित होते. मुश्ताक अली यांनी सुत्रसंचालन केले.
शेवट्या सामन्यात तामिळनाडू २३ धावांनी विजयी
आज च्या दिवसाचा शेवटा सामना त्रिपुरा विरूद्ध तामिळनाडू यांच्यात रंगला. नाणेफेक जिंकून तामिळनाडूने प्रथम फलंदाजी केली. २० षटकात ८ गडी गमावून ११३ धावा तामिळनाडूने केल्यात. यात आर्शी चौधरी २८ धावा, नेत्रा आणि अनुषा प्रत्येकी १९ धावांचे योगदान दिले. त्रिपुरा संघाने ११४ धावांचे लक्ष्य समोर ठेऊन फलंदाजी करण्यास सुरवात केली. परंतु ठरावीक अंतराने गडी बाद होत गेल्याने त्यांना निर्धारित २० षटकात ९ गडी गमावून ९० धावाच करता आल्यात. हिना १७ तर शिवली हिने नाबाद राहत ३३ धावांचे योगदान दिले. तामिळनाडूचा संघ २३ धावांनी जिंकला.
तामिळनाडूनची एल. नेत्रा हिने ऑलराऊंडरची महत्त्वपुर्ण भुमिका निभावत १९ धाव व २ गडी बाद केल्याने तिला सामनावीर पुरस्कार मिळाला. सामानावीर पुरस्कार जैन इरिगेशनच्या व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आयशा साझीद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेत. यावेळी अरविंद देशपांडे, मुश्ताक अली उपस्थित होते. सुत्रसंचालन वरूण देशपांडे यांनी केले.