DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र चेंबर पुढाकार घेणार -ललित गांधी

चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीला जिल्ह्यातील उद्योजकांसह संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव | प्रतिनिधी
 येथील रोटरी भवन येथे महाराष्ट्र चेंबरचे ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील उद्योजक, व्यापारी व संस्थांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर ने राज्यातील उद्योजक, व्यापारी यांचे विविध प्रश्न सोडवण्याबरोबर अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात जोरदार पुढाकार घेतला आहे. जळगाव जिल्ह्यात उद्योग व व्यापार वाढावेत. पायाभूत सुविधांचा विकास व पर्यटनासह जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, ही जळगावकरांची  इच्छा आहे.
याच उद्देशाने जळगाव जिल्ह्यातील उद्योग, व्यापार वाढीसाठी चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला जिल्ह्यातील उद्योजक, व्यापारी, कृषी उद्योजक व संस्था यांची उपस्थिती लक्षणीय होती.
या प्रसंगी ललित गांधी यांनी  महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्याची माहिती देऊन “डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरम” संकल्पना समजवण्यात आली. 850 औद्योगिक संघटना या चेंबरशी संलग्न असल्याने तसेच चेंबरचे कार्य पाहून केंद्र सरकारने राज्यातील 36 जिल्ह्याचे पायाभूत सुविधा व्यापार उद्योग पर्यटन या सर्व क्षेत्रातील  विकासाच्या अपेक्षासह डेवलपमेंट प्लान बनवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्याच्या नियोजनासाठी व्यापार, उद्योग, पर्यटन या सर्व क्षेत्रासह सामाजिक संस्थांच्या सहभागाने ‘महाराष्ट्र चेंबर पुरस्कृत डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरम’ स्थापनेचा निर्णय घेण्यात आला.
जिल्ह्यातील दळण वळणाच्या साधनांची जसे रस्ते, रेल्वे व विमानसेवेच्या वाहतुकीसंबंधी देखील चर्चा करण्यात आली. राज्यातील निर्यात व्यापार सुलभ होण्यासाठी 10 ड्राय पोर्ट मंजूर होण्यासाठी महाराष्ट्र चेंबरने विशेष पुढाकार घेतला आहे. सरकारच्या औद्योगिक क्षेत्रासाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती देऊन उद्योग क्षेत्रातील नवीन संधी यावर सविस्तर मार्गदर्शन उपस्थितांना केले. औद्योगिक क्षेत्रातील प्रमुख अडचण म्हणजे शासकीय धोरण, दुहेरी करपद्धती व यामधील तरतुदी सुधारणा संबंधी चर्चा करण्यात आली. महिलांसह नवतरुणांनी व्यापार उद्योग सुरू करावा, यासाठी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ तर्फे आवश्यक ती मदत करण्यात येईल असे उपस्थितांना ललित गांधी यांनी आश्वासित केले.
जळगाव जिल्ह्याला विकासाच्या महामार्गावर अग्रेसर करून दूरगामी सकारात्मक परिणाम करणारे  धोरण निश्चितीसाठी लवकरच जळगाव जिल्ह्यातील उद्योजक, व्यापारी, कृषी उद्योजक, व्यापार,महिला उद्योजिका,  औद्योगिक संघटनाची भव्य परिषद आयोजित करुन ‘ब्रँड जळगांव’ विकसित करण्याचे ध्येय असल्याचा मानस ललित गांधी यांनी बोलून दाखविला.
महिला उद्योजक समितीच्या अध्यक्षा संगीता पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, राज्यातील महिलांना आत्मनिर्भर बनवून उद्योग, व्यापार क्षेत्रात आणण्यासाठी चेंबरच्या माध्यमातून राज्य शासन व केंद्र सरकारच्या उद्योग विभागांच्या संयुक्त सहकार्याने ‘महिला उद्योजकता अभियान’ राबविण्यात येणार आहे. ज्या माध्यमातून विविध उपक्रम घेऊन महिलांच्या उद्योजकतेसह सर्वांगीण विकासाला चालना मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी गव्हर्निंग कौन्सिल मेंबर नितीन इंगळे, दिलीप गांधी यांच्यासह जिल्ह्यातील विविध व्यापारी उद्योग संघटनेचे प्रमुख व विविध मान्यवर उपस्थित होते.
बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.