भाजपाकडून पारोळा तालुक्यासाठी मंडल अध्यक्ष, शहर अध्यक्षांची नव्याने नियुक्ती
करण पवार समर्थकांच्या हकालपट्टीनंतर कार्यवाही
जळगाव : भारतीय जनता पार्टी सोडून शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणारे लोकसभा उमेदवार करण पवार यांचे समर्थक असलेले तब्बल पाच पदाधिकारी पक्ष विरोधी वर्तन केल्याच्या कारणावरून काही दिवसांपूर्वी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर पारोळा तालुका मंडल अध्यक्ष व पारोळा शहर अध्यक्षांची नव्याने निवड करण्याची कार्यवाही आता भाजपाकडून करण्यात आली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे (भाजपा प्रदेशध्यक्ष) यांच्या आदेशाने, देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री), गिरीशभाऊ महाजन (ग्रामविकास मंत्री), विजय चौधरी (प्रदेश महामंत्री), रवी अनासपुरे (प्रदेश मुख्यालय प्रभारी) यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील,जळकेकर महाराज यांनी जळगाव पश्चिम जिल्ह्यातील पारोळा मंडलाच्या अध्यक्षपदी रवींद्र भोमा पाटील यांची तसेच पारोळा शहर अध्यक्षपदी मुकुंदा भिका चौधरी यांची निवड जाहीर केली आहे. भाजपाचे कार्यालय मंत्री योगेश पाटील यांनी त्यासंदर्भातील नियुक्ती पत्र दोघांना प्रदान देखील केले आहे.
भारतीय जनता पार्टीचे तत्कालिन जळगाव जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष दीपक पंढरीनाथ अनुष्ठान, जिल्हा अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष मोहम्मद युनुस पठाण तसेच भाजपाचे पारोळा तालुका मंडल अध्यक्ष अनिल गुलाब पाटील, पारोळा शहर अध्यक्ष मनीष भाईदास पाटील, पारोळा मंडल भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रवीण पाटील, हे वारंवार पक्षविरोधी वर्तन करत असल्याच्या तक्रारी भाजपा प्रदेश कार्यालयाकडे प्राप्त झाल्या होत्या. सदर तक्रारींची दखल घेत पक्षाचे अनुशासन भंग केल्याप्रकरणी पक्षश्रेष्ठींच्या आदेशावरून पाचही पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.