जैन हिल्स येथे पोळा सण उत्साहात साजरा
जळगाव : प्रतिनिधी
वर्षभर शेतात राबणाऱ्या वृषभराजा बैलांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जैन हिल्सच्या हेलिपॅड पटांगणात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जळगाव येथील वीर योद्धा ग्रुपच्या सदस्यांनी ढोल, ताशा, झांझांच्या गजरात आखाडा, पिऱ्यामीड, तलवार दांडपट्टा यांचे चित्तथरारक प्रात्यक्षिके, (गुजरात) नर्मदा जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी सादर केलेले होलीका नृत्य, मानवी मनोऱ्यांमधून साकारलेला श्रीकृष्ण रथ, शिरसोली येथील ढोल, ताशे तर सावखेडा येथील संबळ वाद्याच्या ठेक्यावर जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व पोळा सणासाठी आलेल्या पाहुण्यांनी नृत्याचा ठेका धरला. मानाचा पोळा फोडण्याचा मान जैन हिल्स येथील सालदार गडी हंसराज जाधव यांनी मिळविला.
जैन इरिगेशन सिस्टिम्स् लिमिटेडच्या कृषी संशोधन व विकास कार्यक्रमांतर्गत जैन हिल्सच्या कृषि विभागातर्फे आयोजित पोळा उत्सवाप्रसंगी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, अनिश शहा, स्वरुप लुंकड, पारस राका, विनय पारख, हेमंत कोठारी, प्रतिभा शिंदे, माजी नगरसेवक अमर जैन, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव संतोष बोबडे, अॅपेक्स कौन्सिल सदस्य राजेंद्र काणे, प्रशिक्षक मंदार दळवी, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अतुल जैन, डॉ. सुभाष चौधरी, राजा मयूर, फरहाद गिमी, शिरीश बर्वे, गांधी रिसर्च फाउंडेशनच्या डीन प्रो. गीता धरमपाल, अनुभूती स्कूलचे प्राचार्य देबासीस दास, अनुभूती स्कूलचे विद्यार्थी, गांधी रिसर्च फाउंडेशनचे डिप्लोमाचे विद्यार्थी, महिला क्रिकेट खेळाडू, पंचक्रोशीतील शेतकरी व नागरिकांची यावेळी उपस्थिती होती. जैन हिल्स हेलिपॅडवर पोळ्यासाठी भव्य दिव्य पोळ्याच्या क्षणचित्रांचे छायाचित्रे असलेल्या पार्श्वभूमिवर सजावट केलेले मंडप व व्यासपीठ उभारण्यात आले होते.
भारतीय कृषीक्षेत्रात कितीही प्रगती झाली तरी १०० वर्षे तरी बैलाविना शेती हे समीकरण अबाधित राहणार आहे. भारतातील ही सॉईल संस्कृती गाय बैलांमुळे टिकून राहिली आहे असे जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांनी आपले विचार व्यक्त केलेल तंतोतंत खरे आहेत. श्रद्धेय भाऊंनी जैन हिल्स येथे पोळा सण साजरा करण्याचा पायंडा सुरू केला आहे तो अव्याहत सुरू आहे असे कार्यक्रमाच्यावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन म्हणाले.
वाडा शिवार सारं, वडिलांची पुण्याई
किती वर्णू तुझे गुण, मन मोहरून जाई
तुझ्या अपार कष्टानं, बहरते सारी भुई
एका दिवसाच्या पूजेनं होऊ कसा उतराई ।।
या काव्य पंक्तीनुसार पोळ्याच्या निमित्ताने सकाळी ८ वाजता ध्यानमंदिरापासून बैलांची सवाद्य मिरवणूक सुरू झाली. श्रद्धेय भवरलालजी जैन यांचे स्मृतिस्थळ असलेल्या श्रद्धा धाम, श्रद्धा ज्योत येथे वंदन नमन करून ही मिरवणूक मारुतीच्या मंदिराजवळ आली. सरस्वती पॉईंट येथे नृत्य व काही चित्तथरारक प्रात्यक्षिके झाले. ११ वाजता पोळा फोडला गेला. पोळा फोडल्यावर जैन परिवारातील सदस्यांसह मान्यवरांनी बैलांचे विधीवत पूजन करून त्यांना पुरणपोळीचा गोड घास भरविला गेला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शेंडे यांनी तर सालदार स्नेहभेट कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सोनजे व किशोर कुळकर्णी यांनी केले.
सालदार गडींचा सपत्नीक गौरव…
श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी, वर्षभर शेतात राबणाऱ्या कंपनीच्या जैन हिल्स बॉटम, गोशाळा, जैन वाडा, जैन व्हॅली व्ह्यू, ५०० एकर, जैन रेसिडेन्सी ६० एकर, जैन डिव्हाईन पार्क, जेआरसी वैजनाथ साईट, जैन सोसायटी शिरसोली अशा विविध ठिकाणाच्या शेती विभागातील ४८ सालदार गडींचा सपत्नीक स्नेहभेट देऊन गौरव केला गेला. त्यात जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, राजा मयूर, सौ. शैलाताई मयूर, सौ. शारदा चौधरी, अनिश शहा, डॉ. अनिल ढाके, विजयसिंग पाटील, प्रवीण जैन, सौ. निशा जैन, डॉ. भावना जैन, शेती विभागाचे संजय सोनजे या मान्यवरांच्याहस्ते हा स्नेह भेट देऊन गौरव करण्यात आला.
पुरणपोळीचा सुग्रास पाहुणचार…
जैन हिल्स येथील आकाश ग्राऊंडवर पुरणपोळी-खीर असा सुग्रास पाहुणचार पोळ्या निमित्ताने होता. ही व्यवस्था राजाभोज खानपान विभागाच्या सहकाऱ्यांच्यावतीने उत्तम केली होती शहरातील निमंत्रीतांसह जैन इरिगेशनमधील सहकाऱ्यांनी या पाहुणचाराचा लाभ घेतला.