३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत राष्ट्रीय एकात्मता शिबीर
जळगाव;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील रा.से.यो. विभाग, युवा व क्रीडा मंत्रालय, नवी दिल्ली आणि रा.से.यो. प्रादेशिक संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत राष्ट्रीय एकात्मता शिबीर होणार असून यामध्ये ११ राज्यातील एकूण २०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
विविध राज्यातील सामाजिक, सांस्कृतिक व खाद्य संस्कृती आदान प्रदान करणे तसेच एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना जोपासण्याचे काम या राष्ट्रीय एकात्मता शिबीरातून होत असते. त्याचाच एक भाग म्हणून हे शिबीर विद्यापीठात होणार आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, केरळ, गोवा, मध्यप्रदेश, कर्नाटक, आसाम, तेलंगणा, ओरीसा आणि तामिळनाडू या राज्यातून एकूण २०० रा.से.यो. स्वयंसेवक या शिबीरात सहभागी होतील. याशिवाय १५ कार्यक्रम अधिकारी सहभागी होणार आहेत. एका राज्यातील पाच विद्यार्थी व पाच विद्यार्थिनी आणि महाराष्ट्राच्या अकृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा यात सहभाग असेल. दिवसभराच्या या शिबीरात बौध्दीकसत्र, सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा आणि गटचर्चा असे नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती रा.से.यो.चे संचालक डॉ. सचिन नांद्रे यांनी दिली.