एसएसबीटी महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव : देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिवस म्हणून श्रम साधना बॉम्बे ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील ग्रंथालय विभागातर्फे साजरी करण्यात आली. यावेळी विविध ग्रंथ, संदर्भ ग्रंथ, नियतकालिके, कादंबरी, आत्मचरित्र आदी पुस्तकांचे प्रदर्शन देखील लावण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी संपूर्ण दिवस ग्रंथालयात वाचन करून अब्दुल कलाम यांना आदरांजली अर्पण केली.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. एस. बी. पवार यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. यावेळी ग्रंथालय समिती प्रमुख डॉ. एम.पी. देशमुख, प्रा. एन. एम. काझी, प्रा.प्रवीण पाटील, मुख्य ग्रंथपाल डॉ. सुधीर पाटील, भटू पाटील, सुनिता पाटील, ईश्वर पाटील व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयातील ग्रंथालयात तब्बल ६४ हजार ७०० पुस्तके उपलब्ध असून त्यामध्ये ९० हून अधिक जर्नल्स आहेत. शिवाय संपूर्ण ग्रंथालय संगणकीय प्रणालीद्वारे कार्यान्वित असून वातानुकूलित वाचनकक्ष उपलब्ध आहेत. त्याशिवाय ग्रंथालयात पुस्तक पेढी योजना विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर ई लायब्ररी सुविधेद्वारे विद्यार्थी विविध पुस्तकांचे ऑनलाईन वाचन देखील करू शकतात. असे यावेळी डॉ. सुधीर पाटील यांनी सांगितले. या उपक्रमाचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. के. पटनाईक यांनी कौतुक केले.