अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नाटिकेतुन सादर केला ‘आजादी का अमृत महोत्सव’
अनुभूती निवासी स्कूलचा 'फाउंडर्स डे' उत्साहात
जळगाव | प्रतिनिधी
भारतीय संस्कृती ही तर्कसंगत बांधिलकीच्या तीन स्तंभांवर उभी आहे, या भारतीय संस्कृतीत परंपरेसह भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि स्वातंत्र्यानंतरची 75 वर्षाच्या प्रगतीची उजळणी करणाऱ्या ‘आजादी का अमृत महोत्सव’ ही नाटिका अनुभूती स्कूलच्या 200 विद्यार्थ्यांनी सादर केली. विद्यार्थ्यांनी सादर केलेला प्रत्येक क्षण उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना रोमांचकारीचा अनूभव दिला.
अनुभूती निवासी स्कूलचा आजादी का अमृत महोत्सव या थीमवर आधारित ‘फाउंडर्स डे’ हा अनुभूती स्कूल चे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या स्मृतींना समर्पित असतो तो मोठ्या उत्साहात साजरा झाला. दीपप्रज्वनाने सांस्कृतिक कार्यक्रमासह नाटिकेला सुरवात झाली. अनुभूतीच्या ॲम्पी थिएटर मध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी ज्ञानपीठ विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी, संघपती दलिचंद जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, डाॕ. सुभाष चौधरी, गिमी फरहाद, अनुभूती स्कूलचे चेअरमन अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन, सौ. ज्योती जैन, सौ. शोभना जैन, डाॕ.भावना जैन, प्राचार्य देबासिस दास यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थितीत 12 वी मध्ये भारतातुन तृतीय रँक प्राप्त करणाऱ्या कु. रूतिका अरूण देवडा, आत्मन अशोक जैन यांचा तर दहावीत प्रथम आलेल्या कु. देबर्णा दास, दक्ष जतिन हरिया यांचा गौरव करण्यात आला. ‘अंकुरानुभूति’ व ‘संदेशानुभूति’ नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले. शिक्षक अरूण गोपाल यांनी गणिताचे सादरीकरण केले. सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना कला विभागातील यशस्वी, आदित्य, सार्थक हे विद्यार्थी सचित्र पेटिंग करीत होते.
आरंभी ‘द फ्युजन हाॕबी’ सादर झाले. यातुन देशभक्तीचा जागर झाला. त्यानंतर भरतनाट्यम्, भांगडा नृत्य यासह भारतीय संस्कृतीमधील नृत्यांची झलक विद्यार्थ्यांनी सादर केली. योग आणि संगीत यांचे उत्तम सादरीकरण केले.
‘आजादी का अमृत महोत्सव’ नाटिकेचे लिखाण ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी केले. नाटिकमध्ये भारतीय परंपरा, इतिहासासह स्वांतत्र्यानंतरच्या 75 वर्षातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा, संविधानाची निर्मिती, संस्थानांचे विलीनीकरण, हरित क्रांती, धवल क्रांती, ठिबक सिंचनात श्रध्देय भवरलाल जैन यांनी घडवून आणलेली क्रांती, संशोधनात्मक प्रयत्नातून शेतकऱ्यांच्या जीवनात झालेले सकारात्मक बदल विद्यार्थ्यांनी नाटिकेतून सादर केले. देशातील उद्योग विश्वातील भरारी, अवकाश संशोधनात भारताचे यश तर कोव्हिड सारख्या आपत्तींत भारतीयांचे व्हॕक्सीन संदर्भातील संशोधन पर्यंतचा थक्क करणारा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांनी उलगडला. सुत्रसंचालन राधिका सोनी, अंजली अग्रवाल, अनुष्का महाजन, सिध्देश मल्लावार यांनी केले.
अन्नदाता सुखी तर आपण सुखी – कुलगुरू डाॕ. विजय माहेश्वरी
भवरलालजी जैन यांच्याकडे दुरदृष्टी होती. ते व्हिजनरी होते. त्यातूनच त्यांनी अन्नदाता सुखी तर आपण सुखी यासाठी जैन इरिगेशनच्या माध्यमातून अहोरात्र प्रयत्न केले. चांगल्या दर्जाचे शिक्षण, अनुभव, इंटिर्गेड लर्निंग या दृष्टीने अनुभूती स्कूलची निर्मिती केली. यश प्राप्त करायचे असेल तर त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न मनापासून केले पाहिजे. व्यक्तीमत्व बदलविणारे शिक्षण पाहिजे, लढणे आणि जिंकणे यातील फरक शिकविणारे शिक्षण अनुभूती स्कूलमध्ये भवरलालजी जैन यांनी उपलब्ध करून दिले.