DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी वेळ, परिश्रम, आत्मविश्वास महत्त्वाचा

 

जिल्हा परिषदेत आयोजित परिसंवादात भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांचा उमटला सूर

 

जळगाव, :-  विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर वेळ,परिश्रम आणि आत्मविश्वासाला फार महत्त्व आहे. या तीनही बाबी वापरून चिकाटीने अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होणे अवघड नाही. त्यासाठी वेळेचे सूक्ष्म नियोजन गरजेचे असल्याचा विश्वास जळगाव जिल्हा परिषदेत आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करुन विविध विभागांच्या नियमित परीक्षा देत असतात. त्यांना सुयोग्य मार्गदर्शन मिळावे, त्यांच्या गुणवत्तेत भर पडावी या हेतुने जळगाव जिल्हा प्रशासनाद्वारे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन रविवार दि.13ऑक्टोबर रोजी करणेत आले होते.

या कार्यशाळेला भारतीय प्रशासन सेवेतील सनदी अधिकारी तथा धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पित चौहान, मूळचे चोपडा येथील रहिवासी व राजस्थान राज्यात कार्यरत असलेले प्रशासकीय अधिकारी गौरव साळुंखे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी शुभम गुप्ता म्हणाले की, अलीकडे दहावी बारावीत असताना पासूनच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू करण्याकडे कल वाढला आहे. मात्र मला असे वाटते की, महाविद्यालयीन कालावधी अनुभवल्यानंतर तरुणांनी स्पर्धा परीक्षांचे अभ्यासाकडे वळले पाहिजे. महाविद्यालयीन कालावधी हा आपल्या आयुष्यावर अनुकूल असा परिणाम करत असतो. परिश्रम वेळेचे सूक्ष्म नियोजन केल्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे काहीच अवघड नाही. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना नुसती भोकमपट्टी करून उपयोग नाही. तर वाचलेले पुस्तके यांचे मनन करणे देखील गरजेचे आहे.स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना परिवारापासून स्वतःला दूर न नेता परिवारासोबत राहणे महत्त्वाचे आहे. पालकांनी देखील आपल्या पाल्यांवर हेच करावे तेच केले पाहिजे असा दबाव न टाकता आपल्या पाल्यांना अभ्यासासाठी मोकळे वातावरण तयार करून देण्याची गरज आहे.स्पर्धा परीक्षेचा ऍडमिशन फॉर्म भरताना काळजी घेतल्यास मुलाखतीच्या वेळी अडचण येत नाही. दबाव आणि टेन्शन जुगारून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे काहीच अवघड नसल्याचे देखील गुप्ता यांनी सांगितले.

जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यावेळी म्हणाले की, स्पर्धा परीक्षेत गती खूप महत्त्वाचे असते. त्यासोबतच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना छंद जोपासणे देखील महत्त्वाचे असते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना शिस्तीला फार महत्व असून दुसऱ्यावर शंका न घेता आपण प्रामाणिकपणे अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षा निश्चितच यश मिळते.स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासातून खूप काही शिकायला मिळते. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना सराव करणे वाचन करणे मनन करणे या बाबीला देखील खूप महत्त्व आहे. त्यासोबतच वेळेला महत्व देत वेळेचे सूक्ष्म नियोजन केल्यास स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे अवघड नसल्याचे श्री अंकित यांनी सांगितले. त्यासोबतच स्पर्धा परीक्षेत मॉक टेस्ट ला महत्व असून उजळणी देखील महत्त्वाची आहे. असेही श्री अंकित यावेळी म्हणाले.

सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण यांनी सांगितले की, मी महाविद्यालयीन जीवनात असताना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. मी अशा खेड्यातून आलोय ज्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचा कोणताही गंध नव्हता. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना अभ्यासक्रमावर अधिक लक्ष देणेमहत्त्वाचे ठरते.एक प्रकारचे प्रश्न स्पर्धा परीक्षेत कधीही येत नाहीत. त्यामुळे मेहनत आणि चिकाटी हे स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्याचे खरे गमक आहे.

राजस्थान मधील प्रशासकीय अधिकारी गौरव साळुंखे यांनी देखील उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यूपीएससीमध्ये उत्तराचे कंटेंट महत्त्वाचे असून मेहनतीला फार महत्त्व असल्याचे सांगितले. उपस्थित चारही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांनी अभ्यासाला कसे सुरुवात केली व ते कसे यशस्वी झाले यातील त्यांचा अनुभव विद्यार्थ्यांसमोर विषद केला.यावेळी उपस्थित चारही अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांकडून आलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिले. उपस्थित विद्यार्थ्यांनी देखील दिलखुलासपणे प्रश्न विचारात स्पर्धा परीक्षांचे अभ्यास करताना येणाऱ्या अडीअडचणी व शंकांवर चारही अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले.

अशा प्रकारचा स्पर्धा परीक्षांंबाबतचा मार्गदर्शन कार्यक्रम यापुढेही विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा संदर्भात घेतला जाईल असे आश्वासन यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी दिले.

*नियमित वृत्तपत्र वाचन महत्त्वाचे*

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना वृत्तपत्रांना देखील फार महत्व आहे. वृत्तपत्रातून आपल्या सभोवतालच्या जगात काय घडत आहे याची माहिती मिळते. स्पर्धा परीक्षांमध्ये ताज्या घडामोडी वर आधारित अनेक प्रश्न असतात. त्यामुळे वृत्तपत्रांचे नियमित व काटेकोरपणे वाचन केल्यास स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यात मदत होते. दररोज किमान दोन ते अडीच तास वृत्तपत्राचे वाचन केल्यास सभोवतालच्या जगात घडणाऱ्या सूक्ष्म घडामोडी देखील आपल्याला कळत असतात व त्याचे आकलन होत असते. असे मार्गदर्शन देखील उपस्थित चारही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना केले.
०००००००००

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.