सोन्या-चांदीच्या दरात घसरण; गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक वातावरण
मुंबई : जागतिक घडामोडींचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारावरही दिसून येत असून, सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये घसरणीचा कल कायम आहे. शुक्रवार (५ जून) सकाळी देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्याच्या दरात घट नोंदवली गेली. राजधानी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ५६ हजार २५० रुपयांवर पोहोचला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा भाव प्रति औंस ४,४७१.७९ डॉलर इतका आहे. अमेरिका-इराण शस्त्रसंधीबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने आणि पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे जागतिक आर्थिक वातावरणावर परिणाम होत आहे. त्याचबरोबर प्रमुख देशांमधील व्याजदर दीर्घकाळ उच्च पातळीवर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काही महिन्यांपूर्वी सोन्याने दोन लाख रुपयांचा विक्रमी टप्पा ओलांडला होता. त्यामुळे सामान्य ग्राहकांसाठी सोन्याची खरेदी आवाक्याबाहेर गेली होती. मात्र सध्या दरांमध्ये झालेल्या घसरणीमुळे सोनं उच्चांकापेक्षा लक्षणीय स्वस्त झाले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याचे दर दीड लाख रुपयांच्या आसपास स्थिर होते, तर आजचा दर १ लाख ५६ हजार रुपयांच्या आसपास आहे.
प्रमुख शहरांतील सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
| शहर | २२ कॅरेट (₹) | २४ कॅरेट (₹) |
|---|---|---|
| दिल्ली | 1,43,240 | 1,56,250 |
| मुंबई | 1,43,090 | 1,56,100 |
| अहमदाबाद | 1,43,140 | 1,56,150 |
| चेन्नई | 1,44,790 | 1,57,960 |
| कोलकाता | 1,43,090 | 1,56,100 |
| हैदराबाद | 1,43,090 | 1,56,100 |
| जयपूर | 1,43,240 | 1,56,250 |
| भोपाळ | 1,43,140 | 1,56,150 |
| लखनऊ | 1,43,240 | 1,56,250 |
| चंदीगड | 1,43,240 | 1,56,250 |
दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीच्या जून महिन्यातील बैठकीचे निर्णय आज जाहीर होणार आहेत. सध्या रेपो दर ५.२५ टक्के असून एप्रिलमधील बैठकीत तो कायम ठेवण्यात आला होता. त्यामुळे आजच्या घोषणेकडे आर्थिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
याचदरम्यान, आरबीआयने सुमारे १२ अब्ज डॉलर्स मूल्याचे सोने विकल्याच्या चर्चांना फेटाळून लावत, देशाचा सोन्याचा साठा ८८०.५२ टन इतकाच कायम असल्याचे स्पष्ट केले आहे.
चांदीतही नरमाई
सोन्यासोबतच चांदीच्या किमतीतही घसरण सुरूच आहे. ५ जून रोजी सकाळी चांदीचा दर प्रति किलो २ लाख ७९ हजार ९०० रुपयांवर नोंदवला गेला. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हरचा भाव प्रति औंस ७३.५६ डॉलर आहे.
विशेष म्हणजे, यावर्षी जानेवारी महिन्यात चांदीने प्रति किलो ४ लाख रुपयांचा ऐतिहासिक टप्पा गाठला होता. मात्र त्यानंतर दरांमध्ये सातत्याने नरमाई दिसून येत असून सध्या चांदीचे भाव तीन लाख रुपयांच्या खालीच व्यवहार करत आहेत.
सोन्या-चांदीच्या दरातील ही घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक मानली जात असली, तरी जागतिक राजकीय आणि आर्थिक घडामोडींमुळे आगामी काळात बाजारात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.