कार पासिंगसाठी लाचेची मागणी; 7 हजार घेताना एजंट जाळ्यात !
दिव्यांग तक्रवदाराची तक्रार; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
जळगाव : दिव्यांग व्यक्तीच्या कारचे कायमस्वरूपी पासिंग करून देण्यासाठी सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना खासगी एजंट योगेश रामभाऊ पाटील (३९, रा. आदर्शनगर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. आरटीओ कार्यालयातील अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांच्या नावाने ही लाच स्वीकारण्यात आली. ही कारवाई १७ ऑगस्ट रोजी जळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालयात करण्यात आली.
तक्रारदार हे दिव्यांग असून वकील म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी १ जुलै रोजी खान्देश मोटार शो-रूममधून कार खरेदी केली होती. कारचे कायमस्वरूपी पासिंग करून देण्यासाठी खासगी एजंट योगेश पाटील याने आरटीओ कार्यालयातील अधिकारी व संबंधित टेबलवरील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून काम करून देण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

तडजोडीनंतर आठ हजार ५०० रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदाराने १७ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. यावेळी सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना योगेश पाटील याला रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे आरटीओ कार्यालयातील दलालांच्या माध्यमातून होणाऱ्या कथित लाचखोरीचा प्रकार समोर आला आहे.