सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी; चांदी २.३९ लाखांवर
जळगाव : एक दिवसाच्या घसरणीनंतर सोने-चांदीच्या दरात पुन्हा वाढ सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसांत चांदीच्या दरात ४ हजार रुपयांची वाढ झाली असून, सोमवारी (१७ ऑगस्ट) चांदीचा दर २ लाख ३९ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचला. त्याचबरोबर सोन्याच्या दरात दोन दिवसांत २ हजार ३०० रुपयांची वाढ होऊन सोने १ लाख ५४ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले.
३ ते १३ ऑगस्टदरम्यान सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ झाली होती. त्यानंतर १४ ऑगस्ट रोजी चांदीच्या दरात ५ हजार रुपयांची घसरण होऊन ती २ लाख ३५ हजार रुपये प्रति किलोवर आली होती. मात्र, १५ ऑगस्ट रोजी चांदीच्या दरात ३ हजार रुपयांची वाढ होऊन ती २ लाख ३८ हजार रुपयांवर पोहोचली. १६ ऑगस्ट रोजी हा दर स्थिर राहिला. त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी पुन्हा १ हजार रुपयांची वाढ झाल्याने चांदीचा दर २ लाख ३९ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचला.
सोन्याच्या दरातही वाढ
सोन्याच्या दरातही १४ ऑगस्ट रोजी १०० रुपयांची घसरण झाली होती. त्यामुळे सोने १ लाख ५२ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर आले होते. त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी सोन्याच्या दरात तब्बल १ हजार ७०० रुपयांची वाढ होऊन ते १ लाख ५३ हजार ९०० रुपयांवर पोहोचले. १६ ऑगस्ट रोजी सोन्याचा दर याच पातळीवर स्थिर राहिला. मात्र, १७ ऑगस्ट रोजी पुन्हा ६०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोने १ लाख ५४ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. सोने-चांदीच्या दरात पुन्हा तेजी आल्याने ग्राहकांच्या खरेदीच्या निर्णयावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
