DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

ग्रामसभेतील वादानंतर ग्रामसेवकाचा मृत्यू

शिवरे येथे मारहाणीचा आरोप; सात जणांविरुद्ध गुन्हा, मुख्य संशयित अटकेत

जळगाव : पारोळा तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेदरम्यान शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या ग्रामसेवकाला काही ग्रामस्थांनी मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेनंतर जीव वाचविण्यासाठी पळत असताना ग्रामसेवक प्रल्हाद पाटील (५२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी पारोळा पोलिसांनी सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ अन्वये गुन्हा दाखल केला असून, मुख्य संशयिताला अटक करण्यात आली आहे.

शिवरे येथे १७ ऑगस्ट रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ग्रामसभेत गावातील विविध प्रश्नांवर चर्चा सुरू असताना जुन्या बिलांच्या कारणावरून ग्रामसेवक प्रल्हाद पाटील आणि काही ग्रामस्थांमध्ये वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक स्वरूपात असलेल्या या वादाचे काही वेळातच हाणामारीत रूपांतर झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

जुन्या बिलांवरून झालेल्या वादादरम्यान संबंधित ग्रामस्थांनी पाटील यांच्याशी हुज्जत घालत शिवीगाळ केली आणि त्यानंतर त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीत पाटील यांनी तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. याच धावपळीत त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात आली. प्राथमिक तपासानंतर सात संशयितांविरुद्ध गुन्हा क्र. ३१५/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे शिवरे परिसरात खळबळ उडाली असून, ग्रामसेवकाच्या मृत्यूबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.